Wed, Apr 24, 2019 20:04होमपेज › Kolhapur › ‘सुपारी’वरून काँग्रेस-राष्ट्रवादीत दुफळी!

‘सुपारी’वरून काँग्रेस-राष्ट्रवादीत दुफळी!

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 29 2017 1:34AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सतीश सरीकर

शालिनी सिनेटोनसंदर्भात प्रशासनाने फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 47 नगरसेवकांनी सह्या केल्या. परंतु, प्रत्यक्षात निवेदन देताना फक्‍त तीनच नगरसेवक होते. काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांच्या लेटरहेडवर नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन असूनही ते आले नाहीत. स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेवक आदिल फरास, ज्येष्ठ नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारीही फिरकले नाहीत. परिणामी, शालिनी सिनेटोनची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी कारभार्‍यांनी घेतलेल्या दोन कोटींच्या सुपारीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दुफळी माजल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

महापालिका प्रशासनाने शालिनी सिनेटोन जागेतील भूखंड क्र. 5 व 6 हे चित्रपटसृष्टीसाठी आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी भाजप-ताराराणी आघाडी, शिवसेनेच्या नगरेसवकांनी आवाजी मताने तो प्रस्ताव नामंजूर केला. चक्‍क प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी कारभार्‍यांनी दोन कोटींची सुपारी घेतली. एरवी प्रस्ताव किंवा ठराव मंजूर करण्यासाठी सुपारी फोडली जाते. या ठिकाणी मात्र उलटे झाले. प्रस्ताव नामंजूर होणार असल्याने आर्थिक सेटलमेंट नसेल, असा सर्वांचा समज झाला. काही दिवसांनी काही कारभार्‍यांचे आणि चलाख नगरसेवकांचे डोळे उघडले. 

नगरसेवकांना कुणकुण लागल्याने कारभार्‍यांना विचारणा होऊ लागली; परंतु कारभारीही आपल्याला अंधारात ठेवून तडजोड केल्याचे सांगू लागले. अखेर 40 लाखांची सुपारी असल्याचे सांगून नगरसेवकांना 38 हजार 800 रुपयांची पाकिटे वाटण्यात आली; मात्र सुपारी कोटींत आणि वाटणी हजारांत म्हणून काही कारभारी दुखावले गेले. त्यातच गेल्या काही सुपार्‍यांतीलही हिशेब काढला. परिणामी, नगरसेवकांतील सुपारीची चर्चा महापालिका चौकात आली. 

काही नगरसेवकांनी 38 हजारांत सिनेटोनची जागा विकायची का, असे म्हणून विरोध केला. प्रशासनाला साथ देण्यासाठी काँग्रेसच्या भूपाल शेटे, सचिन चव्हाण, दिलीप पोवार, लाला भोसले आदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीमधीलच कारभार्‍यांविरुद्ध नगरसेवकांची मोट बांधण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सह्यांची मोहीम राबवून 35 सह्या घेण्यात आल्या; परंतु नंतर नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांच्या लेटरहेडवर आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देण्याचा निर्णय झाला. 

सह्यांच्या मोहिमेत देशमुख यांच्यासह महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, स्थायी सभापती नेजदार, वहिदा सौदागर, नियाज खान, वनिता देठे, प्रा. जयंत पाटील, आदिल फरास यांच्यासह कोणीच सह्यांसाठी फिरकले नाहीत. अखेर शेटे, चव्हाण, पोवार, भोसले आदींनी नगरसेवकांच्या घरोघरी फिरून सह्या घेतल्या. त्यानंतर आयुक्‍तांना निवेदन देतानाही महापालिकेत असूनही कोणी फिरकले नाहीत. तसेच सुपारीचे बिंग फुटल्यापासून ते फोडणारे आणि पदाधिकार्‍यांत प्रचंड धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.

भाजप-ताराराणीतही दोन गट?
शालिनी सिनेटोनची जागा वाचविण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक किरण नकाते व ईश्‍वर परमार यांनी स्वतंत्रपणे आयुक्‍तांना निवेदन दिले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेता किरण शिराळे, ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम व भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनी एकत्रिपणे याच विषयावर आयुक्‍तांना निवेदन दिले; परंतु त्यांच्यासमवेत कोणीही नगरसेवक नव्हते. त्यामुळे या विषयावरून भाजप-ताराराणी आघाडीतही दोन गट पडले असल्याची चर्चाही सुरू आहे. 

शंभर टक्के पाकिटे जमा...
ठरावाच्या सुपारीतील प्रत्येकी 38 हजार 800 रुपयांची पाकिटे नगरसेवकांना देण्यात आली होती; परंतु त्याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच बदनामीच्या भीतीने प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या हालचाली झाल्या. परिणामी, संबंधितांकडून घेतलेल्या सुपारीची रक्‍कम परत द्यावी लागणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना वाटण्यात आलेली पाकिटे त्या त्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जमा करून घेतल्याची चर्चा आहे. शंभर टक्के पाकिटे जमा झाल्याचे सांगण्यात आले. 

सही घेताना माहिती दिली नसल्याची तक्रार...

सुरुवातीला शालिनी सिनेटोनसाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली; परंतु त्यासाठी सह्या घेताना नगरसेवकांना पूर्ण माहिती दिली नसल्याचे नगरसेवक सांगत आहेत. शालिनी सिनेटोनच्या प्रस्तावाची जशी माहिती मिळाली नाही, तशीच विरोध करण्यासाठी सह्या घेताना माहिती दिली नसल्याची तक्रार काही नगरसेवक करत होते. फक्‍त सही पाहिजे... असे म्हणून अनेक नगरसेवकांच्या सुरुवातीला सह्या घेतल्या होत्या. नंतर मात्र पर्यायच राहिला नसल्याने काँग्रेस गटनेता देशमुख यांच्या लेटरहेडवर सह्या केल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले. 

शालिनी सिनेटोनचा फेरप्रस्ताव करा
कोल्हापुरातील शालिनी सिनेटोनसाठी भूखंड आरक्षित ठेवण्याचा फेरप्रस्ताव सादर करा, अशी विनंती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली. नगरसेवक भूपाल शेटे, दिलीप पोवार, लाला भोसले व माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या 47 नगरसेवकांचे निवेदन आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांना गुरुवारी देण्यात आले. 

काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांच्या लेटरहेडवर निवेदन आहे. त्यात म्हटले आहे की, 11 डिसेंबर 2017 ला महासभेत ए वॉर्ड रि. स. नं. 1104 पैकी 5 व 6 हे भूखंड शालिनी सिनेटोन या वापरासाठी आरक्षित करावे, असा ऑफिस प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. हा विषय आमच्या कोणाच्याही लक्षात लक्षात आला नाही. तसेच ऑफिस प्रस्तावाचे पूर्णपणे वाचन न करता आम्ही विषय नामंजू केला आहे; परंतु नंतर प्रस्तावाचा आम्ही पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की ऑफिस प्रस्ताव बरोबर असून, तो मंजूर करणे आवश्यक आहे. महापालिका व शहराच्या द‍ृष्टीने हा प्रस्ताव योग्य व वाजवी वाटत असून, प्रस्ताव पुन्हा येणार्‍या महासभेपुढे फेरप्रस्ताव म्हणून सादर करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. प्रस्तावावर देशमुख यांच्यासह महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, माजी उपमहापौर अर्जुन माने, सभागृह नेता प्रवीण केसरकर, माजी महापौर हसिना फरास, परिवहन सभापती नियाज खान यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नगरसेवकांच्या सह्या आहेत.