Sun, Apr 21, 2019 02:05होमपेज › Kolhapur › महापालिकेतील राजकारण रस्त्यावर

महापालिकेतील राजकारण रस्त्यावर

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:50PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्याच्या निषेधार्थ बुधवारी अफजल पिरजादे यांच्या घरावर राष्ट्रवादी पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून मोर्चा नर्सरी बाग परिसरात अडवून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलकांनी पिरजादे यांचे छायाचित्र असणार्‍या पोस्टरला शेण फासून चपलांचा मारा केला. यावेळी चव्हाण आणि पिरजादे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चावेळी पोलिस आणि आंदोलकांची वारंवार वादावादी झाली.

राष्ट्रवादी पक्षातून निवडून आलेले नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांनी पैशांच्या लोभासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान करून पक्षाला धोका दिल्याचा आरोप राष्ट्रवादी कार्यकर्ते करत आहेत. बुधवारी सकाळी साडेदहापासून आर. के. पोवार यांच्या निवासस्थानाजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमू लागले. बांगड्या, फाटकी साडी, शेण आणि शाई अशी जय्यत तयारी करून कार्यकर्ते पिरजादे आणि चव्हाण यांच्या घरांवर मोर्चा काढण्याच्या तयारीत होते. मात्र, पेठा-पेठांत वाद नको, या भूमिकेतून पोलिसांनी मोर्चा घरावर न नेता मध्येच कुठेतरी थांबवावा, अशी विनंती केली. यावर आर. के. पोवार शहर अध्यक्ष राजेश लाटकर आणि पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यात जोरदार खटके उडाले. 

आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढत आहोत. हा पेठांतील वाद नसून, प्रवृत्तीच्या विरोधातील आंदोलन असल्याने आम्हाला मोर्चा काढण्यास परवानगी  दया असा आग्रह धरला. अकरच्या सुमारास मोर्चास सुुरवात झाली. महाराणा प्रताप चौक भाउसिंगजीरोड सीपीआर चौक सोन्यामारुती चौक परिसर आदी मार्गावरुन मोर्चा नेण्यात आला. महापालिकाचौकात मोर्चा येताच काही कार्यकर्ते महापालिकेच्या बाजुने पिरजादे यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी आदोलक आणि पोलीसांत किरकोळ वादावादी झाली. महिला कार्यकर्त्यां मोर्चात पुढे घुसण्याचा प्रयत्न करीत होत्या. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या मार्गावररुन मोर्चा न्या अशी विनंती कार्यकर्त्यांना केली यावरुन लाटकर आणि सावंत यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक उडाली.  अखेर मोर्चा भाउसिंगजीरोडने सीपीआरचौकाकडे रवाना झाला. सिध्दार्थनगरातील नर्सरी बागेजवळ मोर्चा येताच पोलीसांनी मोर्चा अडविला. यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. पिरजादे यांच्या पोस्टरला शेण फासून चप्पलांचा भडिमार केल. तर चव्हाण आणि पिरजादे यांच्या नावाने शंखध्वनीही केला. नर्सरी बागेच्या पु ढे जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

यावेळी बोलताना आर. के. पोवार म्हणाले, ज्यांनी पक्षाच्या तिकीटावर निवडून आले त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे.   स्वत: पैशासाठी गद्दारी करुन नेत्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. हिम्मत असेल तर नगरसेवकपदाचा राजिनामा देउन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी तेथे पक्षाची ताकद दाखवून देउ. आदील फरास म्हणाले, राष्ट्रवादीने पिरजादे यांना तिकीट देउन निवडून आणले. नेत्0यांनी त्यांना सन्मानाची पदे दिली. पद प्रतिष्ठा देउनही पिरजादे यांनी पैशासाठी पक्षाशी गद्दारी केली आहे. असे असताना उलट आम. हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. शहर अध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले, राष्ट्रवादीने सर्वसामान्यांना पदे देण्याचेकाम केले. पिरजादे यांनाही पद दिले आहे. तरीहीपैशाच्या मोहापायी त्यांनी पक्षाशी धोका केला आहे. त्यांच्यात हिम्मत असेल तर पुन्हा निवडून येउन दाखवावे सभागृहात कधी शब्दही न बोलणार्‍याने आता हे कृत्य करुन बोलावे याचे आश्‍चर्य आहे. याच्या मागे बोलविता धनी वेगळा आहे. पैसे कुठे घेतले कसे घेतले हे सार्‍या कोल्हापुरला कळाले आहे. काळ्या जादुगाराने असेच  एका माजी महापौरास फसविले आहे. आता पिरजादे चव्हाण तुम्ही फसत आहात. उपहापौर सुनील पाटील, जहीदा मुजावर महेश सावंत यांची भाषणे झाली. 

आर. के. पोवार, उपहापौर सुनील पाटील, शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात नगरसेवक मुरलीधर जाधव, सचिन पाटील, संदीप कवाळे, सचिन खेडकर, आदील फरास, आशिष पाटील, महेश सावंत, उत्तम कोराणे, परिक्षीत पन्हाळकर, मेश पोवार, प्रकाश गवंडी, नितिन पाटील, महादेव पाटील, शीतलतिवडे, सुनीता राउत, निशिकांत सरनाईक, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

विचारांशी प्रामाणिक राहणे शिवाजी पेठेची परंपरा राऊत, कोराणे, सूर्यवंशी
आपल्या पक्षाशी आणि विचारांशी प्रमाणिक राहणे ही शिवाजी पेठेची परंपरा आहे. मात्र, नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी केलेली कृती या परंपरेस अशोभनीय आहे, असे पत्रक माजी महापौर सौ. सुनीता राऊत, सम्राट कोराणे, चंद्रकांत सूर्यवंशी, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, अजित राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, कै. रामभाऊ चव्हाण, कै. महिपतराव बोंद्रे, कै. विष्णुपंत इंगवले, कै. सखारामबापू खराडे, कै. शिवाजीराव चव्हाण आणि माजी आ. सुरेश साळोखे, बबनराव कोराणे यांच्या कार्याचा वारसा जपणारी शिवाजी पेठ आहे. अजिंक्य चव्हाण यांना राष्ट्रवादीने मानाचे पद दिले आहे. यासाठी शिवाजी पेठेतील सर्वांनी आ. हसन मुश्रीफ यांच्याकडून लेखी शब्द घेतला होता. अजिंक्य दोन वर्षे शिक्षण समितीचे सभापती राहिले आहेत. 

पेठवासीय लढवय्ये आहेत. स्वत: रविकिरण इंगवले उपमहापौर, स्थायी सभापती राहिले आहेत. उलट इंगवले यांनी पैशांसाठी मत विकणार्‍या प्रवृत्तीचा निषेध करणे गरजेचे आहे.  अजिंक्य चव्हाण यांचे कृत्य अशोभनीय असून, आम्हा लोकांचा अपमान आहे. यामध्ये कोणीही वैयक्तिक राजकारण आणू नये, उलट चव्हाण यांनी राजीनामा देऊन नगरसेवकपदाचा सन्मान राखावा.

शिवाजी पेठ कोणाची खासगी मालमत्ता नाही : इंगवले
शिवाजी पेठ ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, असे माजी उपमहापौर रविकिरण इंगवले व नगरसेविका सौ. तेजस्विनी इंगवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. पेठेतील नागरिक सूज्ञ असून, स्वतंत्र विचाराने वागणारे आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा नेत्यांनी व्यक्तिश: शिवाजी पेठ हा शब्द वापरू नये. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असू दे, राजकारणात राजकीय घडामोडी होत असतात व इतर सर्वपक्षीय नेते मंडळींनी फोडाफोडीचे राजकारण केले आहे. शिवाजी पेठेमध्ये सध्या कोणतेही मानाचे पद नाही. म्हणून अजिंक्य चव्हाण यांनी स्वत:साठी स्थायी समिती सभापतिपद मागितले होते.हे पद न दिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, हे गांभीर्य लक्षात घ्यावे, असेही पत्रकात म्हटले आहे.

शिवाजी पेठेत येऊन मोर्चा काढणे व बोलण्यापेक्षा मी महापालिकेत एकटाच येतो. जर आदिल फरास, मुरलीधर जाधव, राजेश लाटकर यांच्यात दम असेल, तर त्यांनी समोरासमोर विरोध करून दाखवण्याचे आव्हान नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिले आहे. 

कागल, चंदगडमध्ये राष्ट्रवादीकडून सुरू असलेल्या राजकारणाचेच पडसाद कोल्हापूर मनपा राजकारणात सध्या उमटत आहेत. कागलमध्ये स्वत:च्या स्वार्थासाठी संजय मंडलिकांशी युती, चंदगडमध्ये भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी युती करून कोल्हापूर शहरातही जातीय राजकारण सुरू असल्याचे पत्रक राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले आहे. तसेच भाजपकडून निधीची शाश्‍वती मिळाली असल्यानेच मी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

मनपात महापौर, महिला-बालकल्याण समिती, राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष, उपमहापौर या पदावर मुस्लिम समाजातील व्यक्तीचीच निवड करण्यात आली. मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना आतापर्यंत बहुजन समाजातील कोणी दिसला नाही का, अशा सवाल चव्हाण यांनी विचारला आहे. एका मुस्लिम नगरसेवकाची वर्षभरासाठी महापौर म्हणून निवड करण्यात आली. आपल्या प्रभागाच्या विकासकामांसाठी निधी मिळाला नाही. भागाचा विकास करण्यासाठी भाजपकडून निधी मिळणार असल्यानेच पाठिंब्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्या घरावर आज मोेर्चा
नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्याच्या निषेधार्थ आज (दि. 15) चव्हाण यांच्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातून मोर्चास सुरुवात होणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गुरुवारी सकाळी दहा वाजता उभा मारुती चौकात कार्यकर्त्यांनी जमावे, असे आवाहन आर. के. पोवार यांनी केले आहे.