Thu, Apr 25, 2019 05:45होमपेज › Kolhapur › स्थायी सभापतींच्या बजेटला महापौरांकडून कात्री

स्थायी सभापतींच्या बजेटला महापौरांकडून कात्री

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 12:34AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी महापालिकेचे बजेट सादर करताना स्वतःसाठी तब्बल 2 कोटी 10 लाखांचे बजेट घेतले होते. परंतु, बजेटवरून प्रचंड गदारोळ झाल्यानंतर काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी उपसूचना दिली होती. अखेर उपसूचनेद्वारे महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी बुधवारी स्थायी सभापतींच्या बजेटला कात्री लावली आहे. 

त्यांना पदाधिकारी म्हणून 25 लाख व इतर 60 लाख असे केवळ 85 लाखांचे बजेट धरण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध विरोधी भाजप-ताराराणी आघाडी असा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फोडून भाजपने आपल्याकडे सभापतिपद खेचून घेतले.

सत्ता असूनही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करून विरोधी आघाडीतून भाजपचे ढवळे सभापती बनले. परंतु, त्यांनी सादर केलेल्या बजेटवरून प्रचंड रुसाफुगी झाली. बजेटवर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवकही नाराज होते. त्यामुळे यंदाचे बजेट वादाचे कारण ठरले होते. अखेर उपसूचनेद्वारे बजेटमध्ये फेरफार करण्यात आले. तब्बल अडीच महिन्यांनंतर महापौरांची बजेटवर स्वाक्षरी झाली. बजेट उशिरा मंजूर झाल्याने त्याचा शहरातील विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.