Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Kolhapur › भूकंप महापालिकेत, हादरे ‘राधानगरी’त!

भूकंप महापालिकेत, हादरे ‘राधानगरी’त!

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 1:10AMसरवडे  : व्ही. डी. पाटील

कोल्हापूर महापालिकेच्या झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सूनबाई, भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांची पुतणी सौ. मेघा आशिष पाटील यांना अनपेक्षितपणे पराभव पत्करावा लागला. हा पराभव ए. वाय. पाटील यांच्या फारच जिव्हारी लागला असून, आगामी विधानसभेला ते भाजपची उमेदवारी घेणार का? गेल्या काही महिन्यांपासून असलेल्या या चर्चेला स्थायी निवडीत भाजपनेही ए. वाय. यांना दुखावल्याने सध्या तरी जर- तरचा ब्रेक लागला आहे. या निवडीत झालेल्या नाट्यपूर्ण घडामोडींचा दूरगामी परिणाम आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकांवर होणार आहे, एवढे मात्र निश्‍चित आहे. यामुळेच भूकंप महापालिकेत आणि हादरे राधानगरी विधानसभा मतदारसंघात, असेच काहीसे चित्र दिसत आहे.

गेले काही महिने ‘ए. वाय. भाजपच्या वाटेवर’ अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पण, त्याबाबत त्यांनी काहीच वक्तव्य केले नाही. ए. वाय. हे आगामी विधानसभेच्या तयारीला लागले असून त्यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी पक्षाकडे तशी इच्छाही व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघांतील गावागावांत संपर्क वाढवण्यावर भर देत आमदारकीची उमेदवारी मिळवून विधानसभेच्या मैदानात उतरायचेच, असा चंगच त्यांनी बांधला आहे; परंतु त्यांच्या भाजप प्रवेशासाठी त्यांचे व्याही व इचलकरंजीचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर फारच आग्रही आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून ए. वाय. व भाजप नेत्यांत सलगी वाढत असल्याची चर्चा आहे. 
ए. वाय. पाटील व आ. सुरेश हाळवणकर यांच्या नातेसंबंध या सर्व पार्श्‍वभूमीवर स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजप आपल्याला सहकार्य करील व आपल्या सूनबाई सौ. मेघा पाटील यांचा विजय सहज सोपा होईल, अशी आशा ए. वाय. यांना होती. त्यातच मेघा या आ. सुरेश हाळवणकर यांच्या नात्याने पुतणी असल्याने त्यांचीही या कामी मदत होईल, अशी अटकळ त्यांनी व कार्यकर्त्यांनी बांधली होती. परंतु, सभापतिपदाच्या निवडीवेळी घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीमुळे अनपेक्षित पराभवाने ए. वाय. यांचे सर्व अंदाज धुळीस मिळवत भाजपने त्यांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. 

तूर्तास तरी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क केले जात आहेत. भाजपकडेही विधानसभेला राधानगरी- भुदरगड मतदारसंघात स्वतःचा ताकदवान उमेदवार नाही. बिद्री कारखाना निवडणुकीवेळी ना. चंद्रकांत पाटील व आ. प्रकाश आबीटकर यांच्यात यावरूनच कलगीतुरा रंगला होता. मध्यंतरी माजी आमदार बजरंग देसाई यांचे सुपुत्र माजी जि. प. सदस्य राहुल देसाई यांनी विधानसभेला उमेदवारीचा शब्द घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच वेळी भाजपने  ए. वाय. यांनाही गळ घातल्याची चर्चा आहे. परंतु, आता महापालिकेतील घडामोडीमुळे ए. वाय. हे भाजपला कितपत जवळ करणार, हा प्रश्‍नच आहे.