होमपेज › Kolhapur › कचरा उठावसाठी 104 वाहने घेणार

कचरा उठावसाठी 104 वाहने घेणार

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी  

कोल्हापूर शहरातील कचरा उठावसाठी प्रत्येकी एक हजार घरामागे अशा पद्धतीने 104 घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या स्थायी समिती सभेत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सभापती आशिष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, श्रीमती दीपा मगदूम, संजय मोहिते, भाग्यश्री शेटके आदींनी चर्चेत भाग घेतला. 

उपनगरात कचरा उठाव करणार्‍या गाड्या बंद का आहेत? कचरा उठावचे भविष्यात काय नियोजन केले आहे? अशी विचारणा सदस्यांनी केली. त्यावर प्रशासनाच्या वतीने, कचरा उठावसाठी 6 डंपर येतात. 2 डंपर नाले सफाईला, 2 हॉटेल कचर्‍यासाठी, 1 महालक्ष्मी मंदिर परिसरासाठी, 1 मटण-चिकन वेस्टेजसाठी दिलेले आहेत. 2 डंपर खरमातीसाठी अडकल्याने कचरा उठाव करण्यास अडचण येत आहे. भविष्यात 1000 घरांमागे 1 कचरा गाडीप्रमाणे 104 गाड्या घेण्यात येणार आहेत. 81 प्रभागांपैकी 50 प्रभागांत गाड्या फिरतील. उर्वरित प्रभागात डंपर, घंटागाडी, कंटेनर व आर. सी. असेल त्याठिकाणच्या जवळपास प्लँटमध्ये कचरा नेला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. 

गाडी अड्डा येथील परिस्थिती काय आहे? अतिक्रमणमुक्‍त केलेल्या जागेत पुन्हा साहित्य टाकण्यात आले आहे. वाहने व इतर साहित्य जप्त करावे, अशी सूचना सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने, अतिक्रमण काढून चाच मारली होती. रस्त्याचे काम हाती घेतल्यामुळे चाच मुजली गेली आहे. गेटचे काम पूर्ण झाले असून 2 ते 3 दिवसांत गेट बसवून घेऊ, जागेवरील साहित्स जप्त करून जागा बंदिस्त करू, असे स्पष्ट करण्यात आले. 

सायबरटेक सिस्टीम कंपनीचे घरफाळा सर्व्हेचे काम व्यवस्थित नाही. मुदत संपली, पुन्हा मुदतवाढ दिली तरीही त्यांचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली आहे का? 45 टक्के रक्‍कम जवळपास कंपनीस आदा का केली?  कंपनीबाबत तक्रारी वाढत आहेत. कंपनीवर काय कारवाई केली? अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने, शहरातील सी व डी वॉर्डचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ए, बी व ई वॉर्डात सर्व्हे सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. मुदतवाढीचा प्रस्ताव दिला आहे. रोज कंपनीस दंड लावला आहे. दंड त्यांच्या बिलातून वसूल करून घेऊ. वर्कऑर्डर झाल्यानंतर कंपनीस 30 टक्के व नंतर 15 टक्के रक्‍कम दिली आहे. ती रक्‍कम मटेरियलसाठी दिलेली आहे. उर्वरित रक्‍कम घरफाळ्याची एनओसी घेतल्याशिवाय दिली जाणार नाही. आयुक्‍तांशी मिटिंगमध्ये झालेल्या चर्चेमध्ये कारवाईचे अधिकार करनिर्धारक संग्राहक यांना दिलेले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. 

 केएमटीच्या 2014 मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांची रक्‍कम मिळालेली नाही. 2016 नंतरच्या कर्मचार्‍यांना कागदपत्रे अपूर्ण असूनही पैसे मिळालेले आहेत, असे सदस्यांनी सांगितले. त्यावर प्रशासनाच्या वतीने, निवृत्त झालेल्या 27 पैकी 3 केसेसच अपूर्ण आहेत. त्यांची कागदपत्रांची पूर्तता करून घेत आहोत. केएमटीकडे रक्‍कम कमी आहे. पैसे येतीत तसे टप्प्याटप्प्याने रक्‍कम दिली जात आहे. पोलिस विभागाकडचे पावणेदोन कोटी येणे बाकी आहे. ते मिळण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. ते मिळाल्यानंतर सर्वांना 40 टक्के रचम आदा केली जाईल. कर्मचार्‍यांचे साडेपाच कोटी देणे आहे, असे स्पष्ट करण्यात आले.