Mon, May 20, 2019 22:56होमपेज › Kolhapur › जलअभियंत्यांना दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न

जलअभियंत्यांना दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी  

कोल्हापूर शहरातील विस्कळीत पाणी व दूषित पाणीपुरवठ्यावरून सोमवारची सभा गाजली. नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घालून प्रश्‍नांची सरबत्ती करत प्रशासनाला धारेवर धरले. सभागृह नेता दिलीप पोवार यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. दस्तुरखुद्द महापौर सौ. स्वाती यवलुजे व आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोरच त्यांनी हे कृत्य केले. अखेर दूषित पाण्याची बाटली महापौर आसनावर पडली. त्यात आयुक्‍तांच्या मोबाईलसह कागदपत्रे भिजली. उपमहापौर सुनील पाटील, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, अर्जुन माने, प्रवीण केसरकर, मुरलीधर जाधव आदींनी पोवार यांना बाजूला नेले.

पाण्याच्या वेळा का बदलल्या?
भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनी, शहरातील ठराविक भागात कुणाला विचारून पाणीपुरवठ्याच्या वेळा बदलल्या? असा जाब कुलकर्णी यांना विचारला. तसेच पाणीपुरवठ्यासाठी तुम्ही सक्षम असाल तर थांबा; अन्यथा सभागृहातून चालते व्हा, असेही सुनावले. पोवार व परिवहन सभापती राहुल चव्हाण यांनी, गेल्या अडीच वर्षात कुलकर्णी यांनी पाणीपुरवठ्याची कोणती कामे पूर्ण केली? असा प्रश्‍न उपस्थित केला. चव्हाण यांनी, शाहूपुरीतील टाकीत पाणी सोडा; अन्यथा ती पाडू, असा इशारा दिला. सौ. जयश्री चव्हाण यांनी, नाथागोळे तालीम प्रभागात पाण्याच्या कामाचे टेंडर तीन महिने प्रलंबित ठेवल्याचा आरोप केला.  

आयुक्‍तांच्या बंगल्यासारखीच कामे पटापट करा

राजाराम गायकवाड यांनी, पाणीपुरवठ्याची कामे ही अत्यंत आवश्यक आहेत. तरीही जलअभियंता कुलकर्णी हे एस्टिमेंट, टेंडर, वर्कऑर्डर आदी सर्व कामात वर्ष घालवत आहेत. त्यामुळे माणसं मेल्यावर त्यांना स्वच्छ व मुलबल पाणी देणार का? अशी विचारणा केली. भूपाल शेटे यांनी, नूतन आयुक्‍त आल्यावर त्यांच्या बंगल्यातील कामे विनाटेंडरची पटापट केली जातात. तशीच जनतेची  पाणीपुरवठ्याची कामे लवकरात लवकर करावीत, असे सांगितले. विरोधी पक्षनेता विलास वास्कर यांनी, सभागृहात बोंब मारली तरी प्रशासनावर त्याचा काडीमात्र फरक पडत नसल्याचे सांगितले. किरण नकाते यांनी, कुलकर्णी हे फक्‍त मलमपट्टी करणारी उत्तरे देत असल्याचा आरोप केला.    

नियोजन नसल्याने वितरण  व्यवस्था कोलमडली

प्रा. जयंत पाटील यांनी, नियोजनशून्य कारभारामुळे पाणी वितरण व्यवस्था कोलमडून पडली असल्याकडे लक्ष वेधून त्याबद्दल जलअभियंता म्हणून कुलकर्णी यांना काहीच वाटत नसल्याचे सांगितले. अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी, पाणी प्रश्‍न गंभीर बनला असूनही प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याचे सांगितले. अशोक जाधव यांनी, 2003 पासून सुरू असलेल्या कसबा बावडा येथील पाण्याची टाकी पूर्ण कधी होणार? असा प्रश्‍न उपस्थित केला. 

आयुक्‍त चौधरी म्हणाले, शहरातील मोठ्या चार गळती काढण्यासाठी 60 लाख खर्च येणार असून, त्याचे नियोजन केले आहे. अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासाठी पाच टीम तैनात केल्या आहेत. दूषित पाणी येणार्‍या प्रभागनिहाय तक्रारी आल्यास त्या तपासण्यात येतील. आवश्यकतेनुसार कार्यवाही केली जाईल. 

भटकी जनावरे महापालिकेत बांधणार

शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी झालेल्या 25 लाखांच्या खर्चात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेटे यांनी केला. त्यांतर्गत पाच हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी तत्कालीन स्थायी सभापती व सहायक आयुक्तांच्या परवानगीनुसारच खर्च झाल्याचे सांगुन निर्बिजीकरणासाठी पथक असल्याचे स्पष्ट केले. तौफीक मुल्लाणी यांनी शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर बनल्याकडे लक्ष वेधले. उमा बनछोडे यांनी महापालिका परिसर, बाजार गेट व गंगावेश भाजी मंडईत फिरणार्या भटक्या जनावरांचा प्रश्‍न उपस्थित केला. येत्या आठ दिवसांत भटकी जनावरे महापालिका प्रशासनाने पकडून इतरत्र सोडावीत, अन्यथा सर्व जनावरे महापालिका इमारतीतील चौकात आणून बांधू, असा इशाराही दिला. राजसिंह शेळके, नकाते व वास्कर यांनी अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न उपस्थित करून नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांना धारेवर धरले.

नगरसेवकांची जीव गेला तरी... - पूजा नाईकनवरे

सौ. पूजा नाईकनवरे म्हणाल्या, जल अभियंता कुलकर्णी हे सक्षम अधिकारी नाहीत. त्यांना जबाबदारीचे भान नसून ते प्रॅक्टीकल वर्क करत नाहीत. प्रत्येक सभेत नगरसेवक पाण्यावरून गोंधळ घालतात परंतू कुलकर्णी यांना काहीही फरक पडत नाही. नगरसेवक सभागृहात तळमळीने प्रश्‍न मांडतात, परंतू त्याचे त्यांना सोयरसुतक नाही. खोटी उत्तरे देऊन कुलकर्णी हे नगरसेवकांची फसवणूक करत आहेत. नगरसेवकांचा जीव गेला तरी कुलकर्णी यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही, असे सांगुन नाईकनवरे यांनी आम्ही काय खुळी नाही आहोत, आमचा अतिरेक बघू नका असा इशाराही कुलकर्णी यांना दिला. तसेच जनतेच्या पाणी प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी कुलकर्णी यांच्यासोबत नागरिकांचा वादसंवाद कार्यक्रम ठेवावा, अशी सूचनाही केली.  

नगरसेविकेच्या दोन मुलांना डेंग्यू

सौ. वहिदा सौदागर यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात नळाला दूषित पाणी येत असल्याची तक्रार केली. तसेच जलअभियंता कुलकर्णी यांना वारंवार बोलावूनही ते येत नसल्याचे सांगितले. प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गैरसोयीमुळे प्रभागातील साठ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, आपल्याही दोन मुलांना डेंग्यू झाल्याचे सौदागर यांनी सभागृहात सांगितले. यावेळी त्यांनी प्रभागात होणार्‍या अळ्या असलेल्या दूषित पाण्याचा पुरावा म्हणून बाटलीतून पाणी आणून आयुक्‍तांना दाखविले. 

मलईसाठीच 109 कोटींचे टेंडर मंत्रालयात प्रलंबित

अमृत योजनेतून अंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी कोल्हापूर शहराला निधी मिळाला आहे. सुमारे 109 कोटींचे हे काम मंत्रालयात गेले दोन महिने पडून आहे. भाजप-शिवसेनेच्या शासनाने टेंडरमधील मलई व लोणी खाण्यासाठी ते प्रलंबित ठेवले असल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केला. त्याला भाजप गटनेता सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता वास्कर, शेखर कुसाळे, सुनील कदम, राजसिंह शेळके, किरण नकाते यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर शेटे यांनी शासनातील सचिव, इतर अधिकार्‍यांनी टेंडर प्रलंबित ठेवले आहे, असे म्हटल्याचे स्पष्ट केले. मुरलीधर जाधव यांनी सांगितले की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जादा दराची निविदा मंजूर करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे टेंडरचे काम थांबविले आहे का? अशी विचारणा केली. तसेच जलअभियंता कुलकर्णी यांना तुमचे सेटिंग झाले असेल, तर आता हालगी वाजवत ठेकेदाराला टेंडर द्या, असे सांगितले. प्रा. जयंत पाटील यांनी, नूतन महापौर निवड झाल्याशिवाय 109 कोटींचे टेंडर फायनल होणार नसल्याचे सांगितले. तसेच जूनमध्येच हे काम मार्गी लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.