Fri, Jul 19, 2019 05:06होमपेज › Kolhapur › गद्दार नगरसेवकांच्या भावनिक आवाहनास पेठवासीयांनी बळी पडू नये : राष्ट्रवादी 

गद्दार नगरसेवकांच्या भावनिक आवाहनास पेठवासीयांनी बळी पडू नये : राष्ट्रवादी 

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेले आंदोलन निव्वळ दुष्ट तथा गद्दार प्रवृत्तींविरोधातील असून, पेठवासीयांनी या गद्दार नगरसेवकांच्या कोणत्याही भावनिक आवाहनास बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

प्रदेश उपाध्यक्ष आदिल फरास, माजी महापौर आर. के. पोवार, शहर अध्यक्ष राजू लाटकर, उपमहापौर सुनील पाटील, अनिल कदम, जहिदा मुजावर, प्रशांत उगवे, सुहास साळोखे, परीक्षित पन्हाळकर, अमोल माने, उत्तम कोराणे, रियाज कागदी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, स्थायी सभापती निवडीत सव्वा ते दीड कोटी रुपये घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. मेघा अविनाश पाटील यांच्याविरोधात मतदान करणार्‍या नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे आंदोलन सुरू आहे. पक्षाने पर्यायाने आ. मुश्रीफ यांनी, या दोन्ही उमेदवारांना निवडणुकीसाठी निधी दिला आहे. स्वत: मतदारसंघात फिरून त्यांना विजयी केले आहे. याचा दोन्ही गद्दारांना विसर पडला आहे. पक्षाचे आंदोलन या दोन्ही गद्दारांविरोधात आहे. मात्र, राजकारणाचा दुरुपयोग करीत या दोघांनीही आपल्या पेठांना नाहक प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी पेठ, बुधवार पेठ यांचे वेगळे अस्तित्व आहे. या पेठांतून अनेक दिग्गज जन्माला आले आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या परंपरेत भरीव योगदान दिले आहे. माजी आमदार पी. बी. साळोखे, माजी आमदार त्र्यंबक कारखानीस, माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड, माजी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे, माजी आमदार संजयसिंह गायकवाड, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी नगराध्यक्ष सखारामबापू खराडे, रामभाऊ चव्हाण, माजी महापौर भीकशेट पाटील, माजी महापौर दिनकरराव पाटील, प्रल्हाद चव्हाण, विष्णुपंत इंगवले, माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, शामराव शिंदे, माजी नगरसेवक आनंदराव गवंडी, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी महापौर रघुनाथ बावडेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब पिरजादे, माजी उपमहापौर सौ. मालती हळदकर यांनी पेठांचा नावलौकिक वाढवला. शिवाय, कोल्हापूरच्या जाज्वल्य इतिहासात भर टाकली आहे. या स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वानी घोडेबाजाराला कधी स्थान दिले नाही किंवा आपल्या पक्ष संघटनांशी प्रतारणा केली नाही.

त्यामुळे शहरातील सर्वच पेठा या राजकीय मार्गदर्शक आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे आंदोलन पेठांविरोधात नसून, गद्दार प्रवृत्तीविरोधात आहे, असे पत्रकात म्हटले आहे.