Fri, Jan 18, 2019 19:35होमपेज › Kolhapur › घोडेबाजारापेक्षा जनतेचा कौल मानायला शिका : हसन मुश्रीफ

‘घोडेबाजारापेक्षा जनतेचा कौल मानायला शिका’

Published On: May 11 2018 1:55AM | Last Updated: May 11 2018 1:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या राजकारणात घोडेबाजार करत नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण करणार्‍यांनी जनतेचा कौल मानायला शिकले पाहिजे, असा टोला नाव न घेता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावत महापालिकेतील एकही नगरसेवक फुटणार नाही, महापौर आमचाच असेल, असा ठाम विश्‍वास राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केला. 

महापालिकेतील महापौर निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तारूढ आघाडीतील नगरसेवक फोडाफोडीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बँकेत पत्रकार बैठकीत ते बोलत होते. 

आ. मुश्रीफ म्हणाले, घोडेबाजारातून महापालिकेची होणारी बदनामी थांबवावी, गैरप्रकाराला आळा बसावा या हेतूने, यापूर्वी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन महापालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर लढविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यात दोन्ही पक्षांना चांगले यश आले. त्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन केली; पण विरोधी पक्षाला ते रुचलेले दिसत नाही. 

गेली काही दिवस महापालिकेत नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. स्थायी समितीचे सदस्य असलेले राष्ट्रवादीचे दोन सदस्य फोडून भाजपवाल्यांनी त्यांना आपल्या पारड्यात घेण्यात यश मिळवले. यासाठी त्यांना मोठ्या रकमा दिल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर पक्षांतर बंदीच्या कायद्यापासून संरक्षण मिळवून देऊ, असाही विश्‍वास त्यांना दिल्याचे समजते. 

नगरसेवक फुटतात कधी, तर त्यांना पद नसल्याने आणि आर्थिकबाबतीत; पण तसा एकही नगरसेवक आमच्याकडे नाही. आतापर्यंत जे गेले ते कावळे होते, शिल्‍लक राहिलेले मावळे आहेत. हे मावळे कधीही आमच्यातून फुटणार नाहीत, त्याची आपल्याला खात्री आहे, असेही आ. मुश्रीफ यांनी सांगितले. 

जनतेने पाच वर्षांसाठी आमच्या बाजूने कौल दिला आहे. हा कौल त्यांनीही मानावयास हवा होता. घोडेबाजार करणे म्हणजे भ्रष्टाचार आणि महापालिकेची बदनामी करणे होय. महापालिकेतील नगरसेवक अशा गोष्टींना भीक घालणार नाहीत असा विश्‍वास आ. मुश्रीफ यांनी व्यक्‍त केला.