Sat, Apr 20, 2019 10:15होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या महापौरपदी शोभा बोंद्रे, उपमहापौरपदी महेश सावंत (Video)

कोल्हापूरच्या महापौरपदी शोभा बोंद्रे, उपमहापौरपदी महेश सावंत (Video)

Published On: May 25 2018 11:24AM | Last Updated: May 25 2018 12:38PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

अत्यंत चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत हे विजयी झाले आहेत.  महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेने गुरुवारी रात्रीच घेतला होता. त्यामुळे काँग्रेसचा विजयाचा मार्ग सोपा झाला होता. शिवसेनेचा हा निर्णय म्हणजे निवडणुकीला कलाटणी देणाराच ठरला. 

महापौर, उपमहापौर पदासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मतदानात अपेक्षेप्रमाणे शोभा बोंद्रे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची 44 मते मिळाली. तर भाजप-ताराराणी आघाडीच्या  रूपाराणी संग्राम निकम यांना 33 मते मिळाली. शिवसेनेने आधी जाहीर केल्याप्रमाणे तटस्थ राहिले.

उपमहापौरपदासाठी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे महेश सावंत, भाजपचे कमलाकर भोपळे व शिवसेनेचे अभिजित चव्हाण तिरंगी लढत झाली. शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांना अर्ज मागे घेतला आला नाही. या निवडणुकी राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांनी विजय मिळवला. त्यांना आघाडीचे सर्व 44 मते मिळाली. भाजप-ताराराणीच्या कमलाकर भोपळे यांना 33 मते मिळाली. या निवडणूक शिवसेनेचे 4 नगरसेवक गैरहजर राहीले. त्यामुळे सेनेच्या चव्हाण यांना शून्य मते मिळाली.  

असे आहे पालिकेतील सत्तेचे गणित

कोल्हापूर महापालिकेत 44 नगरसेवक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काठावरचे बहुमत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले आहे. शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद दिले आहे. विरोधात असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीकडे 33 इतके संख्याबळ आहे.  

प्रशासनाची खबरदारी तर नेते अलर्ट 

निवडणूकीसाठी महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली होती. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसह महापालिकेबाहेरही सीसीटीव्ही कॅमेर्या ची नजर होत्या. नगरसेवकांनाही ओळखपत्र दाखवूनच आत सोडले गेले. सभागृहात व मुख्य गेटसमोर सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. तसेच मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले. महापालिका सभागृहाबाहेर व गेटसमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आला होता. 
 

पालिकेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस-राष्ट्रवादी: 44
भाजप-ताराराणी: 33
शिवसेना: 04

Tag: kolhapur municipal corporation,  Mayor Election 2018