Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Kolhapur › डेंग्यूवरून कोल्हापूर महासभेत गदारोळ

डेंग्यूवरून कोल्हापूर महासभेत गदारोळ

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 12:09AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

निम्म्याहून अधिक कोल्हापूर शहराला डेंग्यूने विळखा घातल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी महापालिकेच्या महासभेत उमटले. डेंग्यूचा प्रसार करून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी खासगी डॉक्टरांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला. फवारणीसाठी घेतलेली 40 लाखांची औषधे बनावट असल्याचाही आरोप करण्यात आला. सभागृहात उभा राहून प्रचंड गोंधळ घालत मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. सुमारे दोन तासांच्या वादळी चर्चेनंतर अखेर महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी डॉ. पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी प्रमुख उपस्थित होते.

ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम यांनी डेंग्यूचा प्रश्‍न उपस्थित केला. शहरात प्रत्येक प्रभागात डेंग्यूचे रुग्ण असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. शंभर टक्के दोषी असल्याने प्रशासनाने त्याची जबाबदारी घ्यावी. गरिबांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही कदम यांनी केली. सभागृह नेता दिलीप पोवार यांनीही डेंग्यू झालेल्या रुग्णांना खास बाब म्हणून औषधोपचारासाठी मदत करण्याची सूचना केली. भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनी महापालिका प्रशासनालाच डेंग्यू झाला आहे, असे म्हणण्याची वेळ आल्याचे सांगितले. 

उपाययोजना कागदावरच...

काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी डेंग्यूविषयी महापालिका प्रशासनाने काय कारवाई केली? अशी विचारणा केली. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील हे उत्तर देण्यास उभा राहिल्यावर विरोधी पक्षनेता विलास वास्कर, संतोष गायकवाड, राजसिंह शेळके, भूपाल शेटे, अशोक जाधव आदींनी त्यांना धारेवर धरले. डॉ. विजय पाटील यांनाही बोलू दिले नाही. दोघांनाही व्यासपीठापासून बाजूला होण्यास नगरसेवकांनी भाग पाडले. सौ. पूजा नाईकनवरे यांनी प्रशासन गाफील असून अधिकार्‍यांच्या उपाययोजना फक्‍त कागदावरच असल्याचे सांगितले. प्रशासनाला जमत नसेल तर नगरसेवकच प्रशासन हातात घेतील, असा इशाराही त्यांनी दिला. 

40 लाखांची औषधे बनावट...

आरोग्य विभागाने शहरात औषध फवारणीसाठी घेतलेली 40 लाखांची औषधे बनावट असल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केला. त्यामुळेच डास मरत नसल्याचेही सांगितले. डॉ. विजय पाटील हे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सेवाज्येष्ठतेचा आदेश डावलून पाटील यांच्याकडे कार्यभार दिलेला कार्यभार बेकायदेशीर आहे, असा आरोप केला. 

तपासणीसाठी खासगी डॉक्टरकडून लुबाडणूक...

सौ. वहिदा सौदागर यांनी स्वतसह मुले व प्रभागातील दोनशे जणांना डेंग्यू झाल्याचे सभागृहात सांगितले. एवढेच काय... प्रभागातील नवीन लग्न झालेल्या जोडप्यालाही डेंग्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये 600 रुपयांत होणार्‍या तपासणीसाठी खासगी हॉस्पिटल व लॅबमधून हजारो रुपये रुग्णांकडून उकळले जात आहेत. डेंग्यू असल्याचे सांगून रुग्णांना 20 ते 30 हजारला लुबाडले जात असल्याचा आरोपही सौदागर यांनी केला. महेश सावंत यांनी पत्नी व मुलाला डेंग्यू झाल्याचे सांगितले. 

बेसमेंटमध्ये पाणी साठल्यास पोलिसांत गुन्हा...

आयुक्‍त डॉ. चौधरी म्हणाले, 21 ते 30 मे या कालावधीत प्रत्येक प्रभागात औषध फवारणीसह योग्य ती कार्यवाही केली आहे. त्यानंतरही शहरात डेंग्यूचा फैलाव झाला हे मान्य आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असून प्रशासन ही जबाबदारी झटकत नाही. आता 20 ते 27 जून या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 33 प्रभागात प्रत्येकी शंभर कर्मचारी असलेली 11 पथके तैनात केली जातील. घरोघरी सर्व्हे करून कार्यवाही केली जाईल. त्यावर सहायक आयुक्‍त, उपायुक्‍त व आयुक्‍त लक्ष ठेवतील. इमारतींच्या बेसमेंटला पाण्याचा साठा झालेल्या ठिकाणी कारवाई करून पोलिसांत गुन्हे दाखल केले जातील. प्रसंगी त्यांची बांधकाम परवानगी रद्द केली जाईल. 

आरोग्य विभागात घोटाळ्याचा आरोप...

संतोष गायकवाड यांनी आरोग्य विभागात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला. कर्मचारी कमी असूनही जादा दाखवून त्यांच्या नावावर पगार उचलला जात आहे. मोठे रॅकेट असून अधिकार्‍यांची मिलीभगत आहे. त्यामुळेच वारंवार माहिती मागवूनही अधिकारी देत नाहीत. महिन्याला सुमारे 40 ते 50 हजार याप्रमाणे वर्षाला 5 ते 6 लाखांचा अपहार होत असल्याचाही आरोप गायकवाड यांनी केला.

सौ. माधुरी लाड यांनी लाईन बझार येथील झूम प्रकल्पावर कचर्‍याचा डोंगर झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच कचरा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, डांबरी प्रकल्प आदी प्रकल्प लाईन बझारमध्ये असताना आता पुन्हा जैव वैद्यकीय कचर्‍याचा प्रकल्प का केला जात आहे, अशी विचारणा केली. त्याला तीव्र विरोध असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. अशोक जाधव यांनीही कचर्‍यासह सर्व प्रकल्प लाईन बझारमध्येच का? अशी विचारणा केली. भूपाल शेटे यांनी तावडे हॉटेल परिसरातील जागेसाठी आठ कोटींचा टीडीआर दिला असल्याने तेथे कचरा टाकण्याची सूचना केली. आयुक्‍त चौधरी यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत निधी मिळणार असून त्यानंतर झूमवरील कचर्‍याचा प्रश्‍न मिटेल, असे स्पष्ट केले. 

स्कूल बोर्ड सदस्यांच्या निवडी...

महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या (स्कूल बोर्ड) समितीची मुदत संपल्याने नूतन सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. राष्ट्रवादीचे सुनील पाटील व सचिन पाटील, काँग्रेसचे अशोक जाधव, संजय मोहिते व श्रावण फडतारे, ताराराणी आघाडीच्या मेहजबीन सुभेदार व रूपाराणी निकम, भाजपचे अजित ठाणेकर व विजय खाडे आदींचा त्यात समावेश आहे. स्कूल बोर्डवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तेतील वाटाघाटीनुसार राष्ट्रवादीकडे सभापतिपद जाणार आहे. त्यामुळे सचिन पाटील यांची सभापतिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.