Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Kolhapur › मनपा रेकॉर्ड रूममध्ये चोरी; दोघींना अटक

मनपा रेकॉर्ड रूममध्ये चोरी; दोघींना अटक

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 1:10AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

 शिवाजी मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील कोल्हापूर महापालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये झालेल्या चोरीचा लक्ष्मीपुरी पोलिसांनी मंगळवारी छडा लावला. वडणगे (ता.करवीर) येथील दोन सराईत महिलांना अटक करण्यात आली. सुवर्णा मोहन गोसावी (वय 45), कविता संभाजी गोसावी (35) अशी त्यांची नावे आहेत. जुने भंगार, पेपर रद्दी चोरीच्या उद्देशाने महिलांनी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातील रेकॉर्ड रूम फोडून सन 1990 ते 2015 या काळातील महत्त्वाच्या परवाना फाईल्स व रजिस्टर पळविण्यात आल्याने शहरात विशेष करून महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दि. 14 डिसेंबरला मध्यरात्री ही घटना घडली होती. 

 ‘लक्ष्मीपुरी’चे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक दादासाहेब पवार व टीमने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलांचा शोध घेतला. चौकशीअंती नावे निष्पन्न होताच सुवर्णा व कविता गोसावी यांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. संशयितांकडे कसून चौकशी करण्यात आली असता, भंगार साहित्यासह पेपर रद्दीच्या चोरीच्या उद्देशाने रेकॉर्ड रूम फोडून त्यामधील फाईल्सच्या गठ्ठ्यांसह वह्यांचे दप्तर पळवून नेल्याची कबुली संशयितांनी दिली. त्यापैकी 25 किलोची रद्दी आठ रुपये दराने विक्री केल्याचेही उघड झाले. महिलांच्या घरातून 70 किलो वजनाच्या जुन्या फाईल्सचे गठ्ठे हस्तगत करण्यात आल्याचे तपासाधिकारी सावंत यांनी सांगितले. चोरीमागे आणखी काही काळेबेरे असावे का, याचाही शोध घेण्यात येत आहे.

 संशयित महिलांना उद्या (बुधवारी) मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात येईल. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अजिज शेख, अजय वाडेकर, राहुल महाजन, नामदेव पाटील, तानाजी गुरव, विनायक फराकटे, अभिजित घाटगे आदींनी प्रयत्न केले.