Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Kolhapur › विद्युतीकरणाला वेग

विद्युतीकरणाला वेग

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:13AMकोल्हापूर : अनिल देशमुख

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कामासाठी त्यांनी निधीही उपलब्ध करून दिला. यानंतर पुणे-सातारा आणि सातारा-कोल्हापूर अशा दोन टप्प्यात विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

सातारा-मिरज आणि कोल्हापूर-मिरज असे सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. ओव्हरहेड वायरकरिता पोल (खांब) बसविण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. मिरजपासून सुरू झालेले हे काम आता कोल्हापूर स्थानकापर्यंत आले आहे. कोल्हापूर स्थानकात पोल उभे करण्यासाठी सध्या आवश्यक क्राँकीटचे खड्डे तयार करण्यात येत आहेत. येत्या दहा-पंधरा दिवसांत हे कामही पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सध्या मिरजेपासून जयसिंगपूरपर्यंत ओव्हरहेड वायरचे पोल उभारण्यात आले आहेत. हातकणंगले स्थानकातही पोल उभारण्यात आले आहेत. उर्वरित मार्गावर पोल उभारण्याचे काम ऑक्टोबरपूर्वी पूर्ण केले जाणार आहे. यानंतर त्यावर ओव्हरहेड वायर टाकली जाणार आहे. हे सर्व काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

खासगी कंपनीकडून हे काम केले जात आहे. यामुळे हे काम नियोजित वेळेपेक्षा कमी वेळेत होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, कोल्हापूर-मिरज या मार्गाच्या विद्युतीकरणाचे सिव्हिलचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युतपुरवठा करणार्‍या केंद्रांचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात कोल्हापूर-मिरज मार्गावर विजेवरील इंजिनचा वापर होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा विचार आहे, मात्र निर्णय झालेला नाही, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.