होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : दूध बंद आंदोलनाला ईर्ष्येची किनार

कोल्‍हापूर : दूध बंद आंदोलनाला ईर्ष्येची किनार

Published On: Jul 18 2018 2:18AM | Last Updated: Jul 18 2018 1:54AMरेंदाळ : वार्ताहर

रांगोळी गाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र, या गावात दूध आंदोलनावरून मंगळवारी पुन्हा एकदा ईर्ष्या, तणाव, टोकाचे मतभेद दिसून आले. सायंकाळी संकलन केलेले दूध घेऊन जाणारा टेम्पो गावातील विरोधी गटातील चक्‍क दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी बंदोबस्तात गोकुळ संघापर्यंत पोहोच केला. आंदोलनाचा केंद्रबिंदू असणार्‍या गावातूनच दूध संकलन झाल्याने हा चर्चेचा विषय बनला. 

मंगळवारी सकाळी दूध संकलन करून दूध नेण्यात आले होते. राज्यभरात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे सायंकाळी  काय होणार याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. संघटनेकडून गावातील दूध संस्थांना संकलन करू नका, अशी विनंती केली होती. पण संघटना व विरोधी गट यांच्यातील ईर्ष्या टोकाला पोहोचली. दूध संकलन करायचेच ही जिद्द करून विरोधी गटाने ईर्ष्येेने दूध संकलन केले. एवढ्यावरच न थांबता दीडशे ते दोनशेे कार्यकर्त्यांनी टेम्पोला गराडा घालून टेम्पो गोकुळपर्यंत पोहोच केला. आंदोलनाचा केंद्रबिंदू असणार्‍या गावातून दूध गेल्याने आक्रमक संघटना गप्प का, अशी चर्चा आहे.