Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी मीच योग्य!

महापौरपदासाठी मीच योग्य!

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेविकांच्या मुलाखती काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी घेतल्या. महापौरपदासाठी मीच योग्य उमेदवार आहे... आपल्यालाच महापौरपदाची संधी द्यावी, असे म्हणत सातही नगरसेविकांनी आग्रही मागणी केली. आमदार पाटील यांनी सात इच्छुक असले तरी एकालाच उमेदवारी द्यावी लागेल. त्यामुळे नाव निश्‍चित करताना माझीही तारेवरची कसरत होणार आहे. उमेदवारी न मिळाल्यास कुणीही नाराज होऊ नये, असे आवाहन केले. काँग्रेस कमिटीत दुपारी झालेल्या मुलाखतीवेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, मावळत्या महापौर सौ. स्वाती यवलुजे उपस्थित होते.

महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग (ओपन) असे आरक्षण आहे. त्यामुळे काँग्रेसमधून अनेकजण इच्छुक आहेत. सौ. शोभा बोंद्रे, सौ. उमा बनछोडे, सौ. निलोफर आजरेकर, श्रीमती दीपा मगदूम, सौ. जयश्री चव्हाण, सौ. प्रतीक्षा पाटील, सौ. इंदुमती माने आदींनी मुलाखती दिल्या. सर्वांनीच आमदार पाटील यांच्याकडे महापौरपदासाठी आग्रह धरला आहे. यावेळी इच्छुकांचे कुटुंबीयही काँग्रेस कमिटीत आवर्जून उपस्थित होते. आमदार पाटील हेच एका उमेदवाराचे नाव निश्‍चित करणार आहेत. सोमवारी दुपारी चारला ते बंद पाकिटातून एका उमेदवाराचे नाव पाठवून त्यांचाच अर्ज दाखल करण्याची सूचना देतील. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सहलीसाठी रवाना होणार आहेत. 

राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी उपमहापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती सर्किट हाऊस येथे घेतल्या. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर,  माजी महापौर आर. के. पोवार आदी उपस्थित होते. सचिन पाटील व महेश सावंत यांनी उपमहापौरपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघांपैकी एकाचे नाव उपमहापौरपदासाठी निश्‍चित होणार आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीची आज पार्टी मिटिंग
महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तेतील वाटाघाटीनुसार यंदाचे महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. दोन्ही पदांसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांच्या मुलाखती आ. सतेज पाटील व आ. हसन मुश्रीफ यांनी घेतल्या. आघाडी एकसंध ठेवण्यासाठी पुन्हा रविवारी दुपारी पार्टी मिटिंग आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पाटील व मुश्रीफ नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

‘विरोधकांनी घोडेबाजार करू नये’
जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. घोडेबाजाराला फाटा देण्यासाठीच महापालिकेच्या राजकारणात पक्षीय निवडणूक आली आहे. त्यामुळे विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने जनतेचा हा कौल मान्य करून घोडेबाजार करू नये.  बहुमत असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराची बिनविरोध महापौरपदी निवड होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.