Sun, May 26, 2019 18:02होमपेज › Kolhapur › महापौरपद उमेदवारीत यवलुजेंची बाजी

महापौरपद उमेदवारीत यवलुजेंची बाजी

Published On: Dec 19 2017 1:58AM | Last Updated: Dec 18 2017 11:46PM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः प्रतिनिधी 

महापौरपदासाठी स्वाती यवलुजे, उमा बनछोडे, दीपा मगदूम व निलोफर आजरेकर या इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. आपापल्या परीने नेत्यांकडे फिल्डिंग लावली होती. सर्वजण पदासाठी आग्रही होत्या. परिणामी, नगरसेवक, त्यांच्या कार्यकर्त्यांसह शहरवासीयांत कोणाला महापौरपदाची उमेदवारी मिळणार? याबाबत प्रचंड उत्कंठा, हुरहुर लागली होती. परंतु, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी शेवटपर्यंत नावाची गुप्तता राखत सस्पेन्स कायम ठेवला. अखेर चार वाजता काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांना फोन करून त्यांनी स्वाती यवलुजे यांचा फॉर्म भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर सामान्य कुटुंबातील महिलेला संधी मिळाल्याची भावना नगरसेवकांतून व्यक्त करण्यात येत होती.

अजिंक्यतारावर नगरसेवकांची गर्दी...महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने अजिंक्यतारावर इच्छुकांसह नगरसेवकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. परंतु, विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने सतेज पाटील हे नागपूरला गेले आहेत. परिणामी, काँग्रेस गटनेता देशमुख यांनी सोमवारी दुपारी अजिंक्यतारा येथे सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन चारही इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरून घेतले होते. परंतु, सर्व आडाखे बांधून सतेज पाटील यांनी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत सस्पेन्स ठेवला होता. त्यामुळे महापौरपदासाठी कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत सर्वत्र उत्सुकता लागून राहिली होती. 

रिस्क नको म्हणून गोवा...महापालिका राजकारणात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे 44 नगरसेवक असून, विरोधी भाजप-ताराराणीचे 33 आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे साहजिकच सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. परंतु, कोणतीही रिस्क नको म्हणून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्व नगरसेवकांना गोव्याला फिरायला नेले आहे. शुक्रवारी सकाळी महापौरपदासाठी होणार्‍या निवडणुकीवेळीच त्यांना कोल्हापुरात आणले जाणार आहे. दरम्यान, नगरसेविका दीपा मगदूम व उमा बनछोडे या गोव्याला गेल्या नसल्याचे सांगण्यात आले. 
बनछोडे यांचे कार्यकर्ते नाराज...

महापौरपदासाठी उमा बनछोडे इच्छुक होत्या. त्यानुसार त्यांचे पती शिवानंद व सासरे श्रीकांत बनछोडे यांनी नगरसेवकांच्या भेटीगाठी घेऊन नेत्यांकडे फिल्डिंग लावली होती. परंतु, महापौरपदासाठी त्यांचे नाव न आल्याने बनछोडे कुटुंबीय नाराज झाले. सायंकाळी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. शिवसेनेचे आमदार राहत असलेल्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा नगरसेवक निवडून देऊनही डावलल्याने कार्यकर्ते रोष व्यक्त करत होते. उच्च शिक्षित असून, शहरात लिंगायत समाज मोठा असल्याने समाजात पक्ष रुजविण्यासाठी पद आवश्यक होते, अशी भावना बनछोडे यांनी व्यक्त केली. तसेच नाराज कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पद न मिळाल्याने उमा, शिवानंद व श्रीकांत बनछोडे यांना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, शारंगधर देशमुख, अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, सभागृह नेता प्रवीण केसरकर, प्रताप जाधव, राहुल माने, तौफीक मुल्लाणी आदींनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, व्हॉटस् अ‍ॅपवर उमा बनछोडे यांनी राजीनामा दिल्याच्या अफवा पसरत होत्या.