Fri, Jul 19, 2019 05:08होमपेज › Kolhapur › नगरसेवकांचीही वाटणी कारभार्‍यांनी हडपली

नगरसेवकांचीही वाटणी कारभार्‍यांनी हडपली

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 12:42AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

शालिनी सिनेटोन परिसरातील तब्बल सात एकर जागा बिल्डरला मिळवून देण्यासाठी ‘दोन कोटींची सुपारी’ फुटली होती. त्यासाठी ‘सर्वपक्षीय’ कारभार्‍यांनी सभागृहातील नगरसेवकांची ‘दिशाभूल’ करून प्रशासनाचा प्रस्ताव नामंजूर करून घेतल्याचा आरोपही झाला. सुपारीची वाच्यता होऊन टीका होऊ लागल्यानंतर नगरसेवकांना दिलेली ‘पैशाची पाकिटे’ त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी ‘परत’ घेतली. परंतु, अद्यापही ती रक्कम संबंधिताला परत दिली नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी ‘नगरसेवकांचीही वाटणी कारभार्‍यांनी हडपल्याची’ चर्चा महापालिकेत सुरू आहे. सुपारी घेताना ठरल्यानुसार प्रस्ताव नामंजूर करून त्यावर आमची ‘स्वाक्षरी’ झाली असल्याचे सांगत हात झटकले आहेत. कारभार्‍यांनीही ‘आम्ही आमचे काम केले’ असे म्हणून हात वर केले आहेत. अशाप्रकारे कारभार्‍यांनी नगरसेवकांचेच दोन कोटी ढापल्याचे सांगितले जात आहे. 

कोल्हापुरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोनसंदर्भातील प्रशासनाचा प्रस्ताव नामंजूर करून काही पदाधिकारी व कारभार्‍यांनी मोठा ढपला पाडला आहे. ‘सर्वत्र प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आंबा’ पाडला जात असला तरी कोल्हापूर महापालिकेतील कारभार्‍यांनी चक्क ‘प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी सुपारी’ फोडली होती. त्यानुसार काही कारभार्‍यांनी सभागृहात चर्चा घडवून न आणता, नगरसेवकांना विश्‍वासात न घेता घाईगडबडीत ऑफिस प्रस्ताव नामंजूर केल्याचा आरोप दस्तुरखुद्द सर्वपक्षीय नगरसेवकांनीच केला होता. आता संबंधित वटमुखत्यारवर हेरिटेज शालिनी सिनेटोन पाडल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परिणामी ती व्यक्ती आता कोल्हापूरकडे फिरकणार नाही. त्याचा फायदा उठवून रक्कमच ढापल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. विशेष म्हणजे प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी ज्यांचा पुढाकार होता, त्यांनीच संबंधित व्यक्तीवर सिनेटोन पाडण्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यातही पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते. सुपारीत सामील असलेल्या नगररचना विभागातील ‘एक व दोन’ अधिकार्‍यांनीही आपल्याकडे वसुलीचा तगादा लागेल म्हणून लवकरात लवकर गुन्हा दाखल केल्याची चर्चा सुरू आहे.

या व्यवहारापोटी सर्वच पक्षातील प्रमुख व कारभार्‍यांना ‘तीन टप्प्यात 10 कोटी’ मिळणार असल्याची चर्चा नगरसेवकांत होती. तसेच त्यांना ले-आऊट मंजूर करून  ‘5 ते 10 हजार स्के. फू. प्लॉट’ मिळणार होते. हा व्यवहार ले-आऊट मंजूर करण्यापर्यंत त्यांची चर्चा झाली होती. अशाप्रकारे शालिनी सिनेटोन ढपल्याचे वाटप करणार होते. त्यात ‘नगररचना विभागातील अधिकार्‍यांनी मोठी सेटलटमेंट’ केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच संबंधित बिल्डरने भूखंड आरक्षित ठेवणार असल्याचे हमीपत्र देऊनही नगररचना विभागातील अधिकार्‍यांनी प्रस्ताव तयार केला होता. आता सुपारी घेतल्यानंतर प्रस्ताव नामंजूर करून दिला आहे. त्यामुळे आमचे काम संपले, असे सांगितले जात आहे. 

महापालिकेत सत्ताधारी व विरोधकांतही काही ठराविक कारभारी आहेत. सर्व पक्षांत मान्यता असलेले आणि नगरसेवकांना मिळवून देणारे म्हणून काही कारभार्‍यांचा लौकीक आहे. त्यापैकी काही कारभार्‍यांना सुपारी घेतलेल्या कारभार्‍याने 40 लाखांची सुपारी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रत्येक नगरसेवकाला 38 हजार 800 ची वाटणी देण्यात आली. पदाधिकार्‍यांना त्याच्या दुप्पट म्हणजे 77 हजार 600 रु. भागविल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी संबंधित बिल्डरने फक्त ‘10 रुपयाने हिशेब दिल्याची बतावणी’ केली जात होती. सुपारीच्या चर्चेला उधाण आल्यानंतर रक्कम परत देण्यासाठी सर्वच नगरसेवकांकडून पाकिटे घेण्यात आली होती. महापालिकेतील त्या त्या पक्षांच्या प्रमुखांकडे नगरसेवकांची पाकिटे जमा झाल्यानंतर त्याचे पुढे काय झाले हे नगरसेवकांनाही माहिती नाही. मात्र, ‘नगरसेवकांच्या तोंडातला घास’ काढून घेऊन ‘कारभार्‍यांनी आपल्या झोळीत टाकल्याची’ चर्चा सुरू आहे.