Thu, Jul 18, 2019 08:25होमपेज › Kolhapur › ...तर राष्ट्रवादीलाच उमेदवार शोधावा लागणार 

...तर राष्ट्रवादीलाच उमेदवार शोधावा लागणार 

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:31AMकोल्हापूर : निवास चौगले

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती न करण्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम राहिल्यास कोल्हापूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीलाच उमेदवार शोधावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या खासदारकीनंतरच्या पक्षविरोधीत भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ प्रचंड नाराज आहेत, दुसरीकडे प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीत यावे म्हणून मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि महाडिक आणि मंडलिक यांचीही भूमिका अनिश्‍चित आहेत. 

राष्ट्रवादीचे खासदार असूनही महाडिक पक्षापासून चार हात लांबच आहेत. त्यांचे चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कागल विधानसभेत मुश्रीफ यांनाच घेरण्यासाठी म्हाडा चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना बळ द्यायला सुरूवात केली आहे. यातून मुश्रीफ-महाडीक वाद विकोपाला गेला आहे. त्यातूनही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाडीक यांना उमेदवारी दिलीच तर ती मुश्रीफांना मान्य नसेल. याशिवाय लोकसभेनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत खासदार महाडीक यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात यंत्रणा उभी केली, त्यातून दुसऱया फळीतील कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज आहेत. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंतची नाराजी असताना राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याचे धाडस त्यांच्याकडूनही होणार नाही. 

अलिकडच्या काही घडामोडी पाहता खासदारांची उठबस भाजपाच्या व्यासपीठावर नसली तरी नेत्यांसोबत वाढली आहे. महादेवराव महाडीक हे भाजपासोबतच आहेत, त्यांचे पुत्र भाजपाचे आमदार तर स्नूषा भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. त्यातही चुलते महादेवराव महाडीक यांच्यावर त्यांच्या उमेदवारीचा निर्णय अवलंबून आहे. मुश्रीफ, सतेज पाटील विरोधात असताना तेही राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आग्रही असणार नाहीत. त्यातून कदाचित खासदार महाडीक हेच भाजपाचे उमेदवार असतील. भाजपाचे चिन्ह, महाडीक गटाची ताकद आणि गोकुळच्या बळाचा पट या जोरावर मैदान मारू असा त्यांना विश्‍वास आहे.  

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीनंतर पक्षप्रमुख ठाकरे युती न करणाऱयावर ठाम आहे. तसे झालेच तर प्रा. मंडलिक हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. मुश्रीफ, सतेज पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे जाहीर आवाहन केले असले तरी भुमिका निश्‍चित नसल्याने त्यांच्याकडून याला प्रतिसाद नाही. या मतदार संघात शिवसेनेची दोन-अडीच लाख मते आहेत. 

मंडलिक गटाची म्हणून मतांचा गठ्ठा असेल तोही त्यांच्या मागे असेल. मुश्रीफ-सतेज यांचा असलेला महाडीक विरोध व राष्ट्रवादी, काँगे्रसमध्ये महाडीकांविषयी असलेली नकारात्मक मतेही आपल्यालाच मिळणार याची खात्रीही त्यांना आहे. शिवसेना सोडून दुसऱयाची उमेदवारी घेतलेल्यांना यश कितपत मिळते याचा जिल्ह्याचा पुर्वइतिहासही फारसा चांगला नाही. त्यामुळे प्रा. मंडलिक हे शिवसेनेचेच उमेदवार असतील. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीसमोरच उमेदवारीचा प्रश्‍न मोठा असेल.