Fri, Mar 22, 2019 23:50होमपेज › Kolhapur › सुपारी २ कोटींची अन् वाटणी ३८ हजार

सुपारी २ कोटींची अन् वाटणी ३८ हजार

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 27 2017 1:30AM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः सतीश सरीकर

कोल्हापूर महापालिकेत सध्या एका ऐतिहासिक सिनेटोन भूखंडाचा विषय जोरात चर्चेत आहे. भूखंडावरील आरक्षण उठविण्यासाठी तब्बल दोन कोटींची सुपारी फुटल्याचे सांगण्यात येते; मात्र त्यातील वाटणी म्हणून प्रत्येक नगरसेवकाला फक्त 38 हजार 800 रुपयांची पाकिटे मंगळवारी देण्यात आली. सुपारी 2 कोटींची अन् वाटणी 38 हजारचा का? म्हणून नगरसेवक खवळले आहेत. परिणामी, काही नगरसेवक सभागृहात नामंजूर केलेला ठराव पुन्हा फेरप्रस्ताव आणावा म्हणून प्रशासनाकडे मागणी करणार असल्याचे समजते. त्यासाठी पाकिटेही परत देणार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित सिनेटोनच्या जागेतील भूखंड क्र. 5 व 6 हे सिनेटोनसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीनेही तसा ठराव करून हेरिटेज वास्तूमध्ये त्याचा समावेश करावा, असे कळविले आहे. महापालिका प्रशासन हे दोन्ही भूखंड सिनेटोन या वापरासाठीच आरक्षित करण्याचा ऑफिस प्रस्ताव तयार करून तो महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला होता. त्यात नगररचना विभागातील अधिकार्‍यांनी मोठी सेटलमेंट केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच संबंधित बिल्डरने भूखंड आरक्षित ठेवणार असल्याचे हमीपत्र देऊनही नगररचना विभागातील अधिकार्‍यांनी प्रस्ताव तयार केला. संबंधित बिल्डरला जागा परत देण्यासाठी अधिकार्‍यांचाही खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे.  

काही दिवसांपूर्वी महापालिकेची महासभा झाली. दुपारी बाराची सभा चारला सुरू झाली. त्याला हा ठरावच कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. केवळ सेटलमेंटसाठी चार तास लागल्याची चर्चा महापालिका चौकात नगरसेवकांतून सुरू आहे. काही कारभार्‍यांनी सभागृहात चर्चा घडवून न आणता, नगरसेवकांना विश्‍वासात न घेता घाईगडबडीत ऑफिस प्रस्ताव नामंजूर केला, असे सांगण्यात येते. ही जागा बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा काही जणांचा खटाटोप असल्याचा आरोप दस्तुरखुद्द नगरसेवकांतूनच केला जात आहे. त्यामुळे सिनेटोनचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे; मात्र कारभार्‍यांकडून ऐतिहासिक ठेवा संपविण्याचा कुटिल डाव काही नगरसेवकांना मान्य नसल्याचे सांगण्यात येते.