Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Kolhapur › ब्लॉगः रांगड्या कुस्तीत कोल्हापुरी मल्‍लांची पिछेहाट

ब्लॉगः रांगड्या कुस्तीत कोल्हापुरी मल्‍लांची पिछेहाट

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 11:45PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सागर यादव 

रांगड्या कुस्ती खेळात कोल्हापूरच्या मल्लांची पिछेहाट झाली आहे. नुकत्याच पुणे झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेतील कमकुवत कामगिरीमुळे याचा प्रत्यय तमाम कुस्तीप्रेमींना आलाच आहे. कुस्ती पंढरीतील एकही पैलवान या स्पर्धेत विशेष कामगिरी करू शकला नाही. यामुळे एकूणच कुस्ती खेळाची परंपरा आणि त्याच्या जतनासंदर्भातील प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दूरद‍ृष्टीने कोल्हापुरात क्रीडा क्षेत्राचा पाया निर्माण केला. त्याच्या विकासासाठी भक्‍कम आर्थिक पाठबळ दिले. यामुळे आज कोल्हापूर ‘क्रीडानगरी’ म्हणून नावारूपाला आले आहे. शतकोत्तर क्रीडा परंपरेत स्थानिक खेळापासून ते जगभरातील स्पोर्टस् गेममध्ये कोल्हापूरचे खेळाडू राज्य-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक कमवत आहेत. मात्र, कोल्हापूरची रांगडी ओळख असणार्‍या ‘कुस्ती’ खेळात इथले खेळाडू मागे पडले आहेत. याला विविध गोष्टी कारणीभूत आहेत. यात महागाई, अपेक्षित पाठबळाचा अभाव, सर्वच पातळींवर उदासीनता, कुस्तीपटूंच्या करिअरचा प्रश्‍न अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. 

पेठांतील तालीम संस्था नावालाच...
राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापुरातील पेठापेठांत तालीम संस्था निर्माण करून त्यांना सर्व प्रकारची मदत दिली. जगभरातील मल्लांना या तालमीत राजाश्रय दिला. खासबाग कुस्ती मैदान बांधून भरघोस बक्षिसांची मैदाने आयोजित केली. मात्र, कालओघात कुस्ती मैदानांची संख्या दुर्मीळ झाली आहे. पेठांतील तालमीचे लाल आखाडे मुजवून त्यावर व्यायामशाळा, कॅरम क्‍लब बांधण्यात आले आहेत. एकेकाळी 80 च्या घरात असणार्‍या तालमींपैकी सध्या केवळ 4-5 तालमीतच कुस्ती जीवंत असल्याचे वास्तव आहे. तालीम संघ, स्थानिक प्रशासन, केंद्र व राज्य शासनाकडूनही कुस्तीपटूंच्या करिअरचा विचार गांभीर्याने होत नसल्याने अनेकांनी कुस्ती या खेळाकडेच पाठ फिरविली 
आहे. 

खुराकाचा खर्च परवडणे अशक्य 
कुस्तीसाठी एखादा पैलवान घडविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. वेळ, श्रम, पैसा खर्च करावा लागतो. पैलवानांच्या खुराकासाठी विविध गोष्टींची आवश्यकता असते. यात थंडाई, मटण-चिकण, दूध-तूप, लोणी, काजू, बदाम, खारीक अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टींच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने पैलवानकी सर्वसामान्य मध्यमवर्गीय व गोरगरिबांना परवडत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे साहजिकच या खेळातील खेळाडूंची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. ग्रामीण भागातही घरोघरी असणार्‍या गायी-म्हशींची संख्या कमी झाल्याने तेथेही कुस्तीला उतरती कळा लागली आहे.