होमपेज › Kolhapur › पर्यटकांची गर्दी; वाहतुकीची कोंडी!

पर्यटकांची गर्दी; वाहतुकीची कोंडी!

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 11:03PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी. 

मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सलग सुट्ट्यांमुळे शालेय सहली आणि पर्यटकांची रविवारी कोल्हापुरात गर्दी झाली. श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग तुळजाभवानी मंदिर परिसरापर्यंत दुर्तफा होती.  श्री अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, रंकाळा, जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूर आदी पर्यटन व धार्मिक स्थळी गर्दी झाली होती. दरम्यान,ताराबाई रोड, महाव्दार रोड, जोतिबा रोड, बिंदु चौक, रंकाळा, लक्ष्मीपुरी चौकात वाहतूक विस्कळीत झाली. या वाहतूक कोंडींचा पर्यटकांसह स्थानिकांना त्रास सहन करावा लागला. 

पहाटे पाच वाजल्यापासून श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. दुसरा शनिवार, रविवार या शासकीय सुट्ट्यांची पर्वणीसह संक्रांतीच्या मुहूर्तावर परगावच्या पर्यटक, भाविकांनी कोल्हापूरला पसंती दिली. मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, बेळगाव, गुजरातमधून पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले होते.
पर्यटकांच्या गर्दीने दिवसभर शहर हाऊसफुल्ल झाले होते. अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने बॅरिकेड लावून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गसौंदर्याची उधळण करणार्‍या कोल्हापूरला दिवसभरात दीड लाखावर अधिक पर्यटकांनी भेट दिली.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर भाजी-भाकरी-ताक, शाकाहारी , मांसाहारी भोजनासाठी गर्दी होती. दरम्यान, कोल्हापुरात येणार्‍या पर्यटकांसाठी बिंदू चौक, बाबूजमाल, मेन राजाराम हायस्कूल, रंकाळा टॉवर परिसर आणि दसरा चौकात मर्यादित पार्किंग व्यवस्था आहे. मात्र, गर्दीच्या वेळी बाहेरून येणार्‍या पर्यटकांना वाहने लावायला जागा उपलब्ध नसल्याने पार्किंगसाठी जागा शोधण्यासाठी शहरभर फिरावे लागते. तसेच वाहतूक कोंडींचा पर्यटकांसह स्थानिकांना त्रास सहन करावा लागला.