Thu, Jul 18, 2019 10:57होमपेज › Kolhapur › सर्व्हर डाऊनमुळे ‘केडीसीसी’चे  कामकाज तीन दिवसांपासून विस्कळीत

सर्व्हर डाऊनमुळे ‘केडीसीसी’चे  कामकाज तीन दिवसांपासून विस्कळीत

Published On: Mar 01 2018 1:39AM | Last Updated: Feb 28 2018 11:52PMगुडाळ : वार्ताहर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संगणक प्रणाली स्वीकारलेल्या विप्रो कंपनीचा सर्व्हर डाऊन झाल्याने ‘केडीसी’ बँकेच्या मुख्य कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व 191 शाखांचे कामकाज सोमवारपासून गेले तीन दिवस विस्कळीत झालेले असून जिल्हा बँकेच्या लाखो शेतकरी ग्राहकांची तीन दिवस मोठी गैरसोय झाली आहे.

‘केडीसी’ बँकेने ज्या कंपनीकडून संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्या विप्रो कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सोमवारपासून बँकेच्या कामकाजावर परिणाम झाला. सोमवारी मुख्य शाखा आणि जवळपास सर्व शाखांचे कामकाज ठप्प झाले होते. तर मंगळवार आणि बुधवारी ही संगणक प्रणाली धीम्या गतीने सुरू राहिल्याने जिल्ह्यातील शाखांमध्ये ग्राहक खोळंबून राहिले होते. विशेष म्हणजे या संगणकीय दोषामुळे केडीसीच्या लाखो ए.टी.एम. धारकांनाही अन्य बँकांच्या ए.टी.एम. वरून पैसे मिळू शकले नाहीत.

दरम्यान, राज्य शासनाच्या बहुचर्चित कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. शिवाय साखर कारखान्यांकडून ऊस बिलाच्या रकमाही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी ग्राहकांची बँक शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. नेमक्या अशावेळीच संगणक प्रणालीच्या बिघाडामुळे खातेदार शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. याबाबाबत ‘केडीसी’च्या मुख्य कार्यालयातील आय.टी. विभागाशी संपर्क साधला असता आम्ही विप्रो कंपनीच्या सातत्याने संपर्कात असून संगणक प्रणाली सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.