Thu, Apr 18, 2019 16:07होमपेज › Kolhapur › परिवर्तन, पुनर्वसन अन् ज्ञानार्जन!

परिवर्तन, पुनर्वसन अन् ज्ञानार्जन!

Published On: Jun 24 2018 1:56AM | Last Updated: Jun 23 2018 11:41PMकोल्हापूर : दिलीप भिसे

कळंबा कारागृहामध्ये गंभीर गुन्ह्यात कारावास भोगणार्‍या कैद्यांच्या विचार परिवर्तनासह पुनर्वसनासाठी अनेक महत्त्वकांक्षी उपक्रम राबवले जात आहेत. व्यावसायिक प्रशिक्षणासह ज्ञानार्जनाची कवाडे खुली झाली आहेत. कळंबा कारागृहात आजन्म कारावास भोगणारे 135 कैदी पदवीधर बनले आहेत.

कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न होताना गुन्हेगारीच्या चक्रव्युहात भरकटलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुटुंबीय, समाज व्यवस्थेपासून चार हात दूर राहिलेल्या, प्रदीर्घ कारावास भोगून नवी इनिंग सुरू करणार्‍यांना स्वत:च्या पायावर उभारण्यासाठी प्रशिक्षणासह पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची मोफत संधी उपलब्ध झाली आहे.

उर्वरित आयुष्यासाठी धडपड!

 मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यासह आंतरराष्ट्रीय तस्कर, कुख्यात गँगस्टर्स, नक्षलवादी टोळ्यांतील कैदी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असतानाच योजना, सवलतींचा लाभ घेत उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू झालेली आहे.

चौघे कायद्याचे विद्यार्थी

 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत कारागृहात अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या पदवी परीक्षेत 120 कैदी  परीक्षार्थी आहेत. तर 135 जणांनी ‘डिग्री’घेतली आहे. खुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारवास भोगणारे चार कैदी कायद्याचे शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे यात एका महिलेचा समावेश आहे.

लक्षवेधक कुशल कारागीर

क्षुल्लक कारणातून सांगली जिल्ह्यात खुनाची घटना घडली खरी, एका चुकीमुळे सहा जणांचे भरले संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. मारेकरी आणि ज्याचा बळी गेला तो सर्वजण एकमेकांचे जीवलग यार...क्षणिक रागातून बळी गेला. चौघांना शिक्षा झाली. आता ते कारागृहात व्यावसायिक  प्रशिक्षण घेऊन अव्वल दर्जाचे  कारागीर बनले आहेत. सोफा, बेडसह लहान मुलांच्या आकर्षक खेळण्यांच्या मागणीमुळे कारागृहाच्या तिजोरीत मोठी भर पडत आहे.    (क्रमश:)