Thu, May 23, 2019 21:05
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सर्व्हे पूर्ण; लवकरच निर्णय

सर्व्हे पूर्ण; लवकरच निर्णय

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 2:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ब्रह्मपुरी येथील पुरातत्त्व विभागाच्या जागेचा संयुक्त सर्व्हे मंगळवारी पूर्ण करण्यात आला. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच पर्यायी पुलाच्या बांधकाम परवानगीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पुरातत्त्व विभागाचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत अंतिम निर्णय नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयाकडून घेतला जाणार असल्याचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे पश्‍चिम विभागाचे संचालक डॉ. एम. नंबिराजन यांनी सांगितले.

पंचगंगेवरील शिवाजी पुलासाठी पर्यायी पूल बांधण्यात येत आहे. त्याचे 80 टक्के काम झाले आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या कायद्यामुळे या पुलाचे उर्वरित बांधकाम ठप्प आहे. अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये परवानगी मिळवण्यासाठीही प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनीही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला पत्र पाठवून 15 दिवसांत परवानगी देण्याची विनंती केली आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर पुरातत्त्व विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी या विभागाचे अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी उत्खनन केलेल्या ब्रह्मपुरी परिसरातील जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर या जागेचे पुरातत्त्व विभाग, महसूल विभाग व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या वतीने संयुक्त सर्व्हेचे काम सुरू केले. पुरातत्त्व विभागाचे सर्वेअर एस. बी. रिंदे, कोल्हापूर शहर हेरिटेज समितीच्या अध्यक्षा, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, पुरातत्त्व विभागाचे संवर्धक विजय चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे आदींच्या उपस्थितीत आज सायंकाळी सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे विभागीय संचालक डॉ. एम. नंबिराजन आज दुपारी कोल्हापुरात आले. त्यांनीही उत्खनन केलेल्या जागेला भेट देऊन पाहणी केली. तसेच सुरू असलेल्या सर्व्हेबाबत अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. नंबिराजन यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विजय कांडगावे, अमरजा निंबाळकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर डॉ. नंबिराजन यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना करत ब्रह्मपुरी परिसरात करण्यात आलेल्या संयुक्त सर्व्हेचा तातडीने अहवाल द्या, असे आदेश देत पुलाच्या बांधकामासाठी ना-हरकत (एन.ओ.सी.) देण्याबाबत नव्याने अर्ज सादर करण्याची सूचना केली.

दोन दिवस सुरू असलेल्या संयुक्त सर्व्हेत ब्रह्मपुरी येथील पुरातत्त्व विभागाने उत्खनन केलेल्या जागेचा मोजणी नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार उत्खनन करण्यात आलेल्या जागेच्या (साईटस्) सीमारेषाही निश्‍चित करण्यात आल्या आहेत. यामुळे पुरातत्त्व विभागाच्या जागेचे नेमके क्षेत्र निश्‍चित होणार आहे. यानंतर या जागेच्या क्षेत्राचा सद्यस्थितीत नेमका काय वापर होत आहे, हेदेखील स्पष्ट होणार आहे. या जागेचे क्षेत्र अद्याप निश्‍चित झाले नव्हते, ते आता होणार आहे. यामुळे पुरातत्त्व कायद्यानुसार पंचगंगेवरील पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी ना-हरकत देण्याबाबतची प्रक्रिया सोपी होणार आहे.