होमपेज › Kolhapur › प्रेयसीची हत्या... कारावास अन् उद्योजकाच्या पायघड्या!

प्रेयसीची हत्या... कारावास अन् उद्योजकाच्या पायघड्या!

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:36AMकोल्हापूर : दिलीप भिसे

बंगरूळातील उच्चशिक्षित तरुणाला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. मुंबईत बंगला, नोकर-चाकर, अलिशान मोटार, गड्याचा रूबाब औरच... बावीस वर्षीय युवतीच्या सौंदर्यावर भाळला नव्हे, आकंठ बुडाला... दोघात तिसरा... प्रेमाचा त्रिकोण झाला. दगा देणार्‍या प्रेयसीचा खून केला. कारावास झाला...  गड्याने जिद्द सोडली नाही. रेडिओ जॅकी तर,‘फौंड्री’त कुशल कारागीर ठरला. शिक्षेचा कालावधी होताच नामांकित उद्योजक कंपनीने पायघड्या घातल्या. खुनातील कैदी आज, मोठ्या युनिटचा शाखाधिकारी बनतोय...

दीड लाख रुपये दरमहा पगार मोजणारा सॅमसन... तल्लख बुद्धीचा. वयाच्या पंचविसाव्या वर्षी ऐश्‍वर्य भोगत असतानाच रूपवान तरुणीवर नजर पडली. तिनेही प्रतिसाद दिल्याने प्रेम फुलत गेले. मौजमजेत दिवस जात असतानाच त्याच्यात त्रिकोण झाला.

 

रेडिओ जॅकीसह कुशल कामगार!
दोघात तिसरा... गडी कमालीचा भडकला. वाद टोकाला गेला. प्रियकराने तिला संपविले. 1 जुलै 2011 मध्ये त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली. दीड वर्षानंतर कळंबा कारागृहात दाखल झाला. मुक्त विद्यापीठ, शासकीय तंत्रनिकेतनमधून शिक्षण घेतले. कारागृहात काही काळ रेडिओ जॅकी, फौंड्रीत कुशल कारागीर बनला. चांगल्या वर्तवणुकीमुळे 592 दिवसांची शिक्षेत सूट मिळाली.

गंभीर कृत्यामुळे आयुष्याची वाताहत

कैद्याच्या फौंड्रीतील कामाची मोठ्या समूहाने दखल घेतली. कारागृहातून सुटका होताच कंपनीने 60 हजारांच्या पगारावर शाखाधिकारी पदावर नियुक्त केले. बंगला, मोटारीसह त्याच्या पसंतीची ‘जोडीदारीन’ही मिळवून दिली आहे. हाच तरुण आज, दीडशेवर कर्मचार्‍यांचे युनिट स्वत: हाताळतो आहे. एका गंभीर कृत्यामुळे आयुष्याची वाताहत झालेल्या तरुणाचा हा थरारक प्रवास म्हणावा लागेल.

कैद्यांच्या शिक्षेत सूट

कळंबा कारागृहात अडीच वर्षांत कारावास भोगणार्‍या 143 कैद्यांना शिक्षेत सूट देण्यात आली आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे. गुन्हेगारी जगतात भाईगिरी करणारे अनेक नामचिन कैदी कारागृहात अगदी ‘सुतासारखे सरळ’ होतात. रक्षकांचा आदेश त्याच्यासाठी शिरसांवद्य मानण्यात येतो.पोलिसांच्या काठीपेक्षा रक्षकांची काठी किती तरी पटीने मजबूत समजात. त्यामुळेच त्याच्या वर्तनात झपाट्याने बदल घडतो. कारागृहातील चांगल्या वर्तनामुळे 143 कैद्यांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. तर सॅमसनला 10 वर्षांच्या शिक्षेत 1 वर्ष 7 महिने 22 दिवसांची सवलत देण्यात आली आहे.(क्रमश:)