Sat, Aug 24, 2019 18:51होमपेज › Kolhapur › शेतमाल तारण कर्ज योजनेत गुळाचा समावेश

शेतमाल तारण कर्ज योजनेत गुळाचा समावेश

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 2:17AMपुणे  :प्रतिनिधी

गूळ उत्पादक शेतकर्‍यांना चांगला दर मिळावा म्हणून राज्य कृषी पणन मंडळाने तातडीने शेतमाल तारण कर्ज योजना गुळासाठीही राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. याबाबतचा पथदर्शक प्रकल्प कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राबविण्यात येणार असून, तसा प्रस्ताव समितीला दाखल करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. गुळाच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बैठक पणन मंडळात सकाळी बोलावण्यात आली होती. गुळाचे भाव घसरल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर ‘पुढारी’शी बोलताना ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी स्वतःच्या अथवा भाड्याच्या गोदामांमध्ये शेतकर्‍यांच्या गुळाची अडीच महिने साठवणूक करावी. गुळाच्या बाजारभावाच्या सत्तर टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून शेतकर्‍यांना तत्काळ उपलब्ध करून दिली जाईल. सर्वसाधारणपणे 50 लाख रुपयांपर्यंत सुरुवातीला गुळासाठी शेतमाल तारण योजना कोल्हापूर बाजार समितीत राबविण्यात येईल. त्यामध्ये पन्नास टक्के रक्कम पणन मंडळ देईल आणि ही रक्कम बिनव्याजी असेल.

बर्‍याच ठिकाणी साखरेचे मिश्रण करून गूळ तयार केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत; त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाशी चर्चा करून भेसळीला प्रतिबंध घातला जाईल. याबाबतच्या तपासण्या करण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत. राज्यातील सांगली, लातूर, कोल्हापूर बाजार समित्या प्रयोगशाळा उभारणीसाठी पुढे आल्या असून, त्यांना मंडळात प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ज्या बाजार समित्या शीतगृहे उभारू इच्छित आहेत, अशा समित्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. याबाबत तत्काळ बैठक घेऊन त्यास मंजुरी दिली जाईल. राज्यात पणन मंडळाच्या माध्यमातून आंबा आणि तांदूळ महोत्सव भरविण्यात येतात. त्याच धर्तीवर अशा महोत्सवात एका विभागात गूळ महोत्सव भरविण्यात येईल. त्याची सुरुवात इस्लामपूर येथे 10 फेब्रुवारी रोजी होणार्‍या कृषी प्रदर्शनातून करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.