Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Kolhapur › जलतरणपटू वीरधवलचे धडाकेबाज कम बॅक

जलतरणपटू वीरधवलचे धडाकेबाज कम बॅक

Published On: Mar 21 2018 1:17AM | Last Updated: Mar 21 2018 1:17AMकोल्हापूर : सागर यादव 

राष्ट्रीय स्पर्धा खेळताना अचानक पायाला झालेल्या दुखापतीमुळे सराव बंद करण्याची वेळ आली. गुडघ्याचे तंतू (लिगामिंट) तुटल्याने शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘कोल्हापूरचा गोल्डन बॉय : वीरू’ म्हणजेच वीरधवल विक्रम खाडे याने जलतरणात पुन्हा एकदा धडाकेबाज कम बॅक केले आहे. 

दुखापतीतून पूर्ववत झालेल्या वीरधवलने आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविली आहे. सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्याने सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत वीरूने 50 मीटर बटर फ्लाय प्रकारात 24.73 अशी वेळ नोंदवत रौप्य पदक पटकाविले. तर 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात 23.02 अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याची निवड  कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्ससाठी भारतीय संघात झाली आहे. 

कॉमन वेल्थ स्पर्धा जकार्ता (ऑस्ट्रेलिया) येथे 4 ते 15 एप्रिल या कालावधीत होणार आहे. तसेच  18 वी आशियाई स्पर्धा इंडोनेशिया येथे होणार आहे. या स्पर्धेचा कसून सराव वीरधवल करत आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असणार्‍या वीरधवलची बदली मुंबई येथे झाली आहे. तेथून तो सरावासाठी बंगळूर येथे रवाना झाला आहे. प्रशिक्षक निहार अमिन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू आहे. त्याच्या पुढील वाटचालीस जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे पाठबळ मिळत आहे. 

वीरूची ‘धवल’ कामगिरी

मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ गावचा सुपुत्र असणार्‍या वीरधवल खाडे याने लहान वयातच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदकांची लयलूट करून जलतरण (स्विमिंग) खेळात आपला दबदबा निर्माण केला. 50 मीटर, 200 मीटर, 400 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर बटरफ्लाय अशा प्रकारांत वीरूने नवनवीन राष्ट्रीय रेकॉर्डस् निर्माण केले. 2006 च्या राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 6 सुवर्ण पदके त्याने पटकाविली. याचवर्षी त्याने दक्षिण आशियाई स्पर्धेत तीन प्रकारांतील जुने रेकॉर्ड मोडून नवे विक्रम प्रस्थापित केले. यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा सर्वात तरुण भारतीय जलतरणपटू अशी त्याची ख्याती निर्माण झाली. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर फ्री स्टाईलच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. 

या यशस्वी कामगिरीबरोबरच जपान येथे झालेली आशियाई एजग्रुप स्पर्धा (2009), 16 व्या आशियाई स्पर्धा (2010), पुण्यातील राष्ट्रकुल युवा स्पर्धा, कॉमन वेल्थ गेम्स, मलेशिया येथे झालेली स्पर्धा (2008) अशा अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत पदकांची लयलूट केली. त्याच्या या यशस्वी घोडदौडची दखल घेऊन भारत सरकारचा ‘अर्जुन पुरस्कार’ (2011) आणि महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ (2012) देऊन त्याला सन्मानित करण्यात आले आहे. 

 

tags : kolhapur, kolhapur news, sports, kolhapur international player, international swimmer, virdhawal khade, come back