Sat, Jan 25, 2020 06:49होमपेज › Kolhapur › मातंग वसाहतीच्या मदतीसाठी सरसावले दातृत्वाचे हात

मातंग वसाहतीच्या मदतीसाठी सरसावले दातृत्वाचे हात

Published On: Aug 23 2019 7:29PM | Last Updated: Aug 23 2019 7:29PM

कोल्हापूर आयटीयन्स" या देशात व परदेशात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभियंता ग्रुपने वडणगे येथील मातंग वसाहतमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.वडणगे : शिवाजी नवले 

वडणगे (ता.करवीर) येथील मातंग वसाहतमधील पंधरा पूरग्रस्त कुटुंब  मदतीच्या प्रतीक्षेत होती. याबाबतचे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध होताच समाजातील दातृत्वाचे हात या कुटुंबांच्या मदतीसाठी त्वरित सरसावले. भारतात तसेच परदेशात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व कोल्हापूरशी नाळ जोडलेल्या' कोल्हापूर आयटीयन्स' या अभियंता ग्रुपने तसेच इचलकरंजी येथील राजू आवळे युवा मंच व नगरसेवक अब्राहम आवळे यांनी दैनिक पुढारीतील बातमी वाचून मातंग वसाहतीत त्वरित धाव घेतली व  येथील पूरग्रस्त कुटुंबांना मदत दिली.    

महापुरात येथील सर्व घरे बारा दिवस पाण्याखाली होती. चार ते पाच घरे पूर्णपणे कोसळली. येथील जनाबाई भालेकर व मंगल दाभाडे या दोन वृद्ध महिलांची घरे पूर्णपणे कोसळली. रस्त्याकडेला चार काठ्या व प्लास्टिकच्या कागदापासून तयार केलेल्या तात्पुरत्या झोपडीचा त्यांनी आधार घेतला.

तरीही या कुटुंबांना शासकीय मदत मिळाली नव्हती. कोणत्याही सेवाभावी संस्थांची मदत या भागात पोहोचली नव्हती. महापुरात सर्वस्व वाहून गेलेली येथील 15 कुटुंब मदतीच्या प्रतिक्षेत होती. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून या कुटुंबांची उपासमार सुरू होती. याबाबतचे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध झाले होते.

'कोल्हापूर आयटीयन्स' या अभियंता ग्रुपचे सदस्य असलेले व सध्या मलेशियात कार्यरत असलेले प्रविण नाईक यांनी दैनिक पुढारीच्या इंटरनेट आवृत्तीवर वडणगेतील हे वृत्त वाचले. मदतीपासून वंचित असलेल्या येथील मातंग कुटुंबीयांना मदत देण्यासाठी त्यांनी त्वरित आपल्या ग्रुपला आवाहन केले. त्यानंतर या ग्रुपमधील समृद्धी चव्हाण, प्रतिक्षा प्रधाने, श्रुतिका जाधव, गृषा साळवे, ओंकार वेल्हाळ, सौ.स्मिता जाधव, सौ.सिमा प्रधाने यांनी त्वरित वडणगे येथील मातंग वसाहतीत धाव घेऊन येथील 15 कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली.

या ग्रुपचे सदस्य व व सध्या लंडन येथे स्थायिक असलेले संदीप चौगुले यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तेथील आपल्या मित्रांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले. त्यांच्याकडूनही या ग्रुपकडे मदत पोहोचली. ग्रुपने वडणगेसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

इचलकरंजी येथील राजीव आवळे युवा मंचचे कार्यकर्त्यांनी व येथील नगरसेवक अब्राहाम आवळे यांनीही वडणगेला त्वरित भेट देत देऊन येथील महिलांना साडी ,चोळी ,शाल ,चादर ,रजई व एक महिन्याचे रेशन दिले. या कुटुंबाचे त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी केली. 

यावेळी राहुल आवळे, नितीन कांबळे ,अतुल घाटगे ,अमर आळंदी ,अनिल म्हामाणे,इंद्रजित कंबके, अॅड संभाजी आवळे ,जेम्स केंगार ,ललित नावनाळे ,प्रेम मोहिते उपस्थित होते. 

"सातासमुद्रापार दैनिक पुढारी"

वडणगे येथील मातंग वसाहत मधील पंधरा पूरग्रस्त कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे वृत्त "कोल्हापूर आयटीयन्स" या अभियंता ग्रुपचे सदस्य प्रविण नाईक यांनी पुढारीच्या ऑनलाईनवर वाचले. कोल्हापूरशी नाळ जोडलेल्या या ग्रुपच्या सदस्यांचे कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरू होते. परदेशात स्थायिक असलेल्या नाईक यांनी वडणगेतील या बातमीची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली. व त्वरित या ठिकाणी मदत करण्याची सूचना केली. ग्रुपच्या सदस्यांनी या ठिकाणी त्वरित धाव घेत येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.


कोल्हापूर आयटीयन्स" हा भारतात तसेच परदेशात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आठ हजार अभियंत्यांचा ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कोणत्याही प्रसिद्धीचा हेतू न ठेवता लोकांना संकटकाळात मदत करतो. मी स्वतः पुढारी ऑनलाइन वाचत असल्याने मला मलेशियात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराच्या भीषणतेची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारेच आम्हाला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक पूरग्रस्तांना मदतीचा हात देता आला. याबद्दल दैनिक पुढारीचे मनापासून धन्यवाद

- प्रवीण नाईक, (कागल,कोल्हापूर सध्या मलेशिया येथे कार्यरत)