होमपेज › Kolhapur › गॅस सिलिंडर झालाय स्मार्ट; तुम्ही पाहिला का?

गॅस सिलिंडर झालाय स्मार्ट; तुम्ही पाहिला का?

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 1:55AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील

गॅस सिलिंडर ही प्रत्येक कुटुंबीयांची अपरिहार्य गरज बनली आहे. त्यामुळेच या व्यवसायात अनेक गैरप्रकार सर्रास सुरू असतात. यापुढे मात्र सगळ्या काटामारीला चाप बसून काळा बाजारही थांबणार आहे. आरपार दिसू शकेल अशा पद्धतीची रंगीबेरंगी सिलिंडर यापुढे उपलब्ध केली जाणार आहेत. या सिलिंडर टाकी वजनाने हलक्या आहेत. सिलिंडरचा स्मार्ट पर्याय आता उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांत हे सिलिंडर प्रायोगिक तत्त्वावर दिले जात असून, लवकरच ते देशभरातील घराघरांत पोहोचवले जाणार आहेत.

गॅस सिलिंडर हा नागरिकांचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे; पण आपल्याकडे असणार्‍या सिलिंडरचे वजन हे तुलनेने खूपच जड आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील सिलिंडर  उचलून ठेवण्यामुळे अनेक महिलांना कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याचे एका खासगी सर्वेक्षणातून स्पष्ट झाले होते; पण आता महिलांना दिलासा देणारी गोष्ट आहे. कारण, या लोखंडी सिलिंडरला बाय-बाय करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. नवे सिलिंडर लाल, पिवळे, हिरवे, निळे अशा विविध रंगांत बनवण्यात आले आहे. तसेच दोन, पाच आणि दहा किलोमध्ये हे सिलिंडर मिळणार आहे. या सिलिंडरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गॅस आपण सहजपणे पाहू शकणार आहोत. त्यामुळे सिलिंडरमध्ये गॅस किती आहे, हे ग्राहकांना समजू शकेल. सध्या गॅस चोरी म्हणजेच यामध्ये काटामारी होत असल्याच्या तक्रारी होतात. गॅसचा काळा बाजारही चर्चेचा विषय आहे. आता या नव्या सिलिंडरमुळे या दोन्ही प्रकारांना आळा बसेल. एप्रिल 2018 पर्यंत पूर्ण देशात हे नवे सिलिंडर दिसेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी) ने हे नवे सिलिंडर बनवले आहे.

नवे आणि जुने सिलिंडर फरक

जुने सिलिंडर वजनाने 14.2 किलोचे, तसेच लोखंडी आहे. त्यामुळे सिलिंडर वजनाने जड आहे. नवे सिलिंडर हे दोन, पाच, दहा किलो वजनाचे असणार आहे. नवे सिलिंडर हे विविध रंगांत असणार आहे. जुन्या सिलिंडरमध्ये गॅसचे प्रमाण दिसत नाही; पण नव्या सिलिंडरमध्ये गॅस सहजपणे दिसतो. तसेच नवे सिलिंडर पोर्टेबल आहे.