Wed, Jun 26, 2019 23:39होमपेज › Kolhapur › दीड लाख मद्यपींना ‘परमीट’

दीड लाख मद्यपींना ‘परमीट’

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 12:36AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : डी. बी. चव्हाण

थर्टीफर्स्टसाठी दीड लाख तळीरामांना परमीट देण्याचे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने नियोजन केले आहे. गतवर्षी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील 500 मीटरच्या आतील दारूची दुकाने बंद होती. त्यामुळे  परमीट देण्याचा विषय  नव्हता.  यावर्षी मद्यविक्रीत वाढ करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. सर्व परमीटधारकांना नेहमीपेक्षा 25 ते 30 टक्के जादा खप झाला पाहिजे, अशी तोंडी तंबी अधिकारी परवानाधारकांना देत असल्याचे असोसिएशनच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले.

थर्टीफस्टला आता उत्सवाचे स्वरूप येऊ लागले आहे. तरुणापासून ज्येष्ठापर्यंत सर्वजण या आनंदात रमलेले असतात.  यानिमित्ताने पार्ट्या केल्या जातात. त्यामध्ये  ओघाने मद्य येतेच. या पार्ट्या शक्यतो घराबाहेर, हॉटेल किंवा माळावर केल्या जातात. अशा पार्ट्यांमध्ये मद्य पिण्यासाठी परवाने देण्यात येणार आहेत. मद्यप्राशन करणार्‍याकडे परवाना नसल्याने तो गुन्हा ठरतो. असे मद्यपी कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात. परवाना प्रक्रिया माहिती नसल्याने अनेकजण परवाने घेत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने एक दिवसाचा परवाना दिला जातो. परवानाधारक बीअर बार व हॉटेलमधून हे परवाने देण्याची सोय  आहे. 5 व 2 रुपये शुल्क भरून  परवाने देण्यात येणार आहेत. 

गतवर्षी महामार्गावरील 500 मीटरच्या आतील दारूची दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे सरकारमार्फत विक्री केली जाणारी देशी आणि विदेशी दारूची दुकाने बंद होती. गतवर्षी 31 डिसेंबर रोजी शासनाने सायंकाळी 6 वाजता आदेश देऊन दारूची दुकाने रात्रभर उघडी ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. पण,  फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यंदा तोटा भरून काढण्यासाठी अधिकार्‍यांकडून प्रयत्न सुरू आहेत. 

‘त्या’ मशीनचे काय?

दारू पिण्याचा परवाना घेतला तरी  तपासणीच्या नावाखाली पोलिस रात्रीच्यावेळी वाहने अडवून गाडीतील व्यक्तीच्या तोंडासमोर ब्रिथ अ‍ॅनालायझर नेऊन त्याची तपासणी करतात. यामध्ये  कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर  कारवाई होते. त्यामुळे  या दिवशी अनेक जण घरात राहून पिणे पसंत करतात. त्याचा फटका परमीटरूमधारकांना बसतो, त्यामुळे पोलिसांनी दारू पिऊन दंगा करणार्‍यांवर जरूर कारवाई करावी, पण चारचाकी वाहनातून जाणार्‍यावर कारवाई  करू नये, अशी अपेक्षा बीअर बार परमीट रूम असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.