होमपेज › Kolhapur › पालकमंत्र्यांना मतदारसंघात कार्यक्रम करू देणार नाही

पालकमंत्र्यांना मतदारसंघात कार्यक्रम करू देणार नाही

Published On: Aug 11 2018 1:20AM | Last Updated: Aug 11 2018 1:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

 मराठा आरक्षण आंदोलनाची दखल सरकारकडून घेतली जात नाही, याउलट त्यांचे प्रतिनिधी आंदोलनाबद्दल चुकीची विधाने करत आहेत. मराठा समाजातील अनेेक तरुणांनी आत्महत्या करूनही सरकारकडून आरक्षणाबद्दल ठोस घोषणा किंवा त्यासाठीच्या उपाय-योजना करण्याबाबत चालढकल केली जात आहे. या सर्व गोष्टींबद्दल कारणीभूत असणार्‍या भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मतदारसंघात कार्यक्रम करू देणार नसल्याचा इशारा काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी दिला. 

ऐतिहासिक दसरा चौकातील ‘आरक्षणाचे जनक’ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकासमोर सुरू असणार्‍या सकल मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चाच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनास शुक्रवारपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच विविध संस्था-संघटनांसह नागरिकांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला. जिल्हा परिषदेतील काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे सदस्य दुपारी आंदोलनस्थळी आले. यावेळी जि.प. सदस्या रोहिणी आबिटकर, स्वरूपा जाधव, वंदना जाधव, सविता चौगले, शिल्पा पाटील, शिवानी भोसले,  मुरगूड पंचायत समिती सभापती स्नेहल परीट, जि.प.सदस्य जीवन पाटील, मनोज फराकटे, विनय पाटील, राहुल पाटील, सतीश पाटील, बजरंग पाटील, भगवान पाटील, पांडुरंग भांदिगरे, अरुण सुतार, करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, बंडा माने, विजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.