Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Kolhapur › मुंबईतील सराफ व्यापार्‍यावर हल्ला करून 40 लाखांचे दागिने लुटले (व्हिडिओ)

मुंबईतील सराफ व्यापार्‍यावर हल्ला करून 40 लाखांचे दागिने लुटले (व्हिडिओ)

Published On: Feb 07 2018 10:41AM | Last Updated: Feb 08 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुंबईतील सराफ व्यापार्‍याला घातक शस्त्रास्त्राचा धाक दाखवून, दांडक्याने हल्ला करून सराईत टोळीने 35 ते 40 लाखांचे दागिने लुटले. गुजरीतील जैन श्‍वेतांबर मंदिरजवळील ‘मरूधन भवन’ प्रवेशद्वारासमोर बुधवारी पहाटे सहा वाजता ही घटना घडली. हल्ल्यात व्यापारी कांतिलाल जयवंतराज मेहता (वय 53, रा. गोकुळ को-ऑप. हौसिंग सोसायटी, बोरिवली पूर्व, मुंबई) हे जखमी झाले. मध्यवर्ती परिसरात ही घटना घडल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.

ताराराणी चौक परिसरात शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर सहाव्या दिवशी लुटारूंनी पुन्हा दहशत माजविल्याने पोलिस अधिकार्‍यांची तारांबळ उडाली आहे. लुटारूंच्या शोधासाठी शहरासह जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली आहे; पण सायंकाळपर्यंत टोळीचा सुगावा लागला नव्हता.

‘रिव्हॉल्व्हर’सारख्या हत्याराचा वापर

टोळीतील चारही हल्लेखोरांसह गुन्ह्यातील मोटार सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचे विविध फुटेजही उपलब्ध झाले आहेत. 25 ते 35 वयोगटातील हल्लेखोर तब्येतीने धडधाकट आहेत. डोक्यावर कानपोटी, तोंडाला मफरल त्यांनी गुंडाळले होते. स्वेटर परिधान केलेल्या हल्लेखोरांच्या हातात दांडकी आहेत. एकाच्या हातात रिव्हॉल्व्हरसारखे हत्यार दिसून येेते, असेही वरिष्ठाधिकार्‍यांनी सांगितले.

हल्लेखोर स्थानिक की बाहेरील असावेत, याबाबत संभ्रम आहे. गुन्ह्यातील मोटार हल्लेखोरांनी घटनास्थळापासून शंभर फूट अंतरावर माजी महापौर शिरीष कणेरकर यांच्या बंगल्याजवळील झाडाखाली पार्क केली होती. 

व्यापार्‍याकडून दागिन्यांची पिशवी हिसकावून घेतल्यानंतर सर्वांनी मोटारीकडे धाव घेतली. कपिल तीर्थ मार्केटच्या दिशेने हल्लेखोर त्याच मोटारीतून पसार झाल्याचे फुटेजवरून स्पष्ट झाल्याने हल्लेखोर स्थानिक असावेत, असाही संशय आहे.

स्थानिक टिपसरने माहिती पुरविल्याचा संशय

व्यापार्‍याच्या आर्थिक उलाढालीची माहिती असणार्‍या ‘टिपसर’ने हल्लेखोरांना माहिती पुरविली असावी, असाही कयास आहे.त्यादृष्टीने अधिकार्‍यांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत, असेही सांगण्यात आले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह चारही पोलिस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचार्‍यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

आठ पथकांमार्फत शोधमोहीम

व्यापारी मेहता यांनी राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. व्यापार्‍याने केलेल्या वर्णनानुसार हल्लेखोरांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. आठ विशेष पथके नियुक्‍त करून कागल, निपाणी, संकेश्‍वर, पेठनाका, कराड, जयसिंगपूर, इचलकरंजी, सांगली, मिरजेकडे रवाना करण्यात आली आहेत. कोगनोळी (ता. चिक्‍कोडी) व किणी टोलनाक्यावरील फुटेज तपासण्यात येत आहे.

25 वर्षांपासून सराफी पेढ्यांच्या संपर्कात

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, बोरिवली पूर्व येथील सराफ व्यापारी मेहता यांचा कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील सराफी पेढ्यांच्या मागणीनुसार तयार दागिने पुरविण्याचा व्यवसाय आहे. गेल्या 20-25 वर्षांपासून गुजरीतील अनेक सराफ पेढ्यांच्या संपर्कात आहेत. मागणीनुसार दागिने पुरविण्यासाठी ते प्रत्येक बुधवारी कोल्हापुरात येतात. नित्यानुसार आज पहाटेही मेहता निमआराम बसने कोल्हापुरात आले होते.

लुटारू टोळीने व्यापार्‍याला भरचौकात घातला गराडा

मध्यवर्ती बसस्थानकावरून मेहता रिक्षातून गुजरीतील जैन श्‍वेतांबर मंदिराजवळ आले. पहाटे सहा वाजता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ‘मरूधर भवन’ यात्री निवासाकडे चालत जात असताना मुरलीधर नागवेकर व हरिदास कालेकर ज्वेलरी फर्मजवळ दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पाठोपाठ भवनसमोर थांबलेल्या अन्य दोघांनीही त्यांच्या दिशेने धाव घेतली.

तिघांचा दांडक्याने हल्ला; तर एकाने शस्त्र उगारले...

चौघेही संशयित आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात मेहता यात्री निवासाकडे पळत सुटले. तिघांनी व्यापार्‍याला यात्री निवासच्या प्रवेशद्वारावर रोखून दांडक्यांनी मारहाण सुरू केली. तर एकाने रिव्हॉल्व्हरसारख्या शस्त्राचा धाक दाखविला. मेहता यांनी प्रतिकाराचा प्रयत्न करताना आरडाओरड केली. नागरिकांकडे मदतीची याचना केली. दरम्यानच्या काळात हल्लेखोरांनी व्यापार्‍याला मारहाण करून दागिन्यांची पिशवी हिसकावून घेऊन कपिल तीर्थच्या दिशेने पलायन केले.

हल्लेखोरांनी मोटारीतून पळ काढला 

व्यापार्‍याने आरडाओरड केल्याने माजी महापौर कणेरकर तातडीने गॅलरीत आले असता त्याचवेळी हल्लेखोरांनी मोटारीतून सुसाट वेगाने पळ काढला. त्यानंतर काही काळात यात्री निवासातील रखवालदार दिलीप कुडाळकर धावत आले. चौघांनी आपणाला मारहाण करून लुटल्याची व्यापार्‍याने रखवालदारास माहिती दिली. दरम्यानच्या काळात नगरसेवक किरण नकाते, रणजित पारिख, राजेश राठोड, विजय हावळ, किरण गांधी यांच्यासह परिसरातील नागरिक धावत आले. त्यांनी व्यापार्‍याकडे चौकशी केली.

पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळाकडे धाव

जुना राजवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधून भरवस्तीत घडलेल्या लूटमारीच्या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक  काकडे, डॉ. अमृतकर, दिनकर मोहिते, अनिल गुजर यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी व्यापार्‍याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यात्रीभवनसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध जारी करण्यात आला. आठ ते दहा ठिकाणचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्याआधारे तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत.

दीड किलोचे दागिने लुटले

लुटारू टोळीने सुमारे 40 ते 45 लाख रुपये किमतीचे साधारणत: दीड किलोचे तयार दागिने लुटल्याचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले. त्यामध्ये राजकोट वाट्या, बंगाली हार, कानातील बाली, सोन्याच्या बांगड्या अशा दागिन्यांचा समावेश आहे.

हल्लेखोरांनी खेळण्यातील बंदुकीचा दस्ता फेकून दिला

मोटारीतून पलायन करताना हल्लेखोरांनी खेळण्यातील बंदुकीच्या स्प्रिंगसह प्लास्टिकचा दस्ता गटारीत फेकून दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. पोलिसांनी या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.

रिव्हॉल्व्हरही बनावट : वरिष्ठाधिकार्‍यांचा संशय

व्यापार्‍यावर रोखण्यात आलेली रिव्हॉल्व्हरही बनावट असावी, असा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा संशय आहे. सराईतांना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठस्तरावर शोधमोहीम सुरू आहे.टोळीचा लवकरच छडा लावण्यात यश येईल, असा दावा पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

हल्लेखोरांनी व्यापार्‍याचे कपडेही फाडले

व्यापारी मेहता यांनी शर्टाच्या बंडीत दागिने लपविले असावेत, ही शक्यता गृहीत धरून हल्लेखोरांनी व्यापार्‍याच्या अंगावरील सर्व कपडे फाडून टाकले. त्याच्याकडील पाण्याची बाटलीही रस्त्यावर भिरकावून टाकण्यात आली होती.

व्यापारी वर्गासह सामान्यांतही चिंतेचे सावट

लूटमारीच्या वाढत्या घटनामुळे शहर, जिल्ह्यातील व्यापारी वर्गासह सर्वसामान्यातही चिंतेचे सावट पसरले आहे. ताराराणी चौक परिसरातील घटनेनंतर लागलीच काही दिवसात गुजरीत गजबजलेल्या व्यापारपेठेत घडलेल्या घटनेमुळे सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. सराईत टोळ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वच थरातून होऊ लागली आहे.