Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-गारगोटी मार्गावर एस.टी. पेटली

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर एस.टी. पेटली

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 11 2018 1:17AMचुये :वार्ताहर

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर हणबरवाडी (ता. करवीर) येथील गणपती मंदिराजवळ शॉर्टसर्किटने आग लागून एस. टी. जळून खाक झाली. अजित केरबा कांबळे (वय 35, रा. आकुर्डे, ता. भुदरगड) यांनी प्रसंगावधान राखल्याने एस.टी.तील 46 प्रवासी सुखरूप बाहेर पडले.

गारगोटी आगाराची एस. टी. सीबीएस आगारातून सकाळी 8 वाजता 46 प्रवाशांना घेऊन गारगोटीकडे जात होती. एस. टी. जैताळ फाट्याजवळ आल्यावर चालक कांबळे यांना इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी थोड्या अंतरापर्यंत गाडी तशीच नेली; पण इंजिनमधून जास्त  धूर व आग येत असल्याचे लक्षात आल्यावर हणबरवाडी गावाजवळ एस. टी. थांबवली. माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला; पण आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात येणार नसल्याचे लक्षात येताच चालक व वाहक या दोघांनीही सर्व प्रवाशांना खाली उतरवून सुरक्षित ठिकाणी नेले. काही वेळेतच पूर्ण एस. टी. जळून खाक झाली.

प्रवाशांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यांनी वेळेत येऊन आग आटोक्यात आणली. या आगीत एस.टी.चे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले. प्रवाशांच्या बॅगा, महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले. यातील प्रवासी पार्वती शंकर कंदले (वय 75, रा. घालवाड, ता. शिरोळ) यांची बॅग, तीन हजार रुपये रोकड व मोबाईल, त्यांचा मुलगा 
लक्ष्मण कंदले यांची बॅग व कपडे, साहित्य पूर्ण जळाले. विनायक देसाई यांचा लॅपटॉप व मोबाईल व महत्त्वाचे पेपर जळाले. काही प्रवाशांना पुढील प्रवास करण्यासाठी पैसे नव्हते. आगारप्रमुख विजय हवालदार यांनी या प्रवाशांची गैरसोय दूर करून त्यांची प्रवासाची व्यवस्था केली.

या अपघातामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे स.पो.नि. अर्जुन पोवार व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा केला व वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात झाली आहे.