Mon, Mar 25, 2019 03:27
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › "श्री" मुर्तीत भाव ओतणारा डोळस कलाकार (video)

"श्री" मुर्तीत भाव ओतणारा डोळस कलाकार (video)

Published On: Sep 11 2018 7:42PM | Last Updated: Sep 11 2018 7:42PM                                                                            पुढारी ऑनलाईन : निलेश पोतदार

जग पाहण्यासाठी मनुष्‍याला मिळालेले डोळे म्‍हणजे निसर्गाची एक अद्‍भूत देणगी. डोळयांविना जगाची आपण कल्‍पानाही करू शकत नाही. डोळे हा विषय कधीच कुणासाठी संपलेला नाही. माणूस असो, प्राणी असो किंवा चित्र, शिल्‍प असो. डोळा म्‍हणजे या प्रत्‍येकाचा जीव आणि प्राणही. भारतात उत्‍सव अनेक होतात, त्यातीलच एक महाराष्ट्रातील उत्‍सव म्‍हणजे गणेशोत्‍सव. या गणेशोत्‍सवात 'श्री' ची मूर्ती खास आकर्षणाचा मानबिंदू असली तरी गणरायाचे डोळेही मग आकर्षणाचाच मानबिंदू ठरतात. मुर्तीला जिवंतपणा येतो तो त्याच्या डोळ्यांमुळेच. विद्‍येचं आणि सार्‍यांचं लाडकं दैवत म्‍हणजे श्रीगणेश. अशा या गणरायाचे आगमण अवघ्‍या दोन दिवसांवर आले आहे. गणेशमुर्त्यांमध्ये जिवंतपणा आणणार्‍या डोळे निर्मितीवर पुढारी ऑनलाईनचे हे विशेष वृत्त...

गणपती म्‍हटले की, मंगलमई, मांगल्‍यरूपी, प्रसन्न मुद्रेतली मुर्ती आपल्‍या डोळ्यासमोर येते. अशी मंगलमुर्ती घडवणे म्‍हणजे कसबचं असतं. ते कसब कारागीर आपल्‍या कौशल्‍यातून साकारत असतात. गणेश मुर्ती मग ती कोणत्‍याही स्‍वरूपातली असो, पण या मुर्तीला जिवंतपणा येतो तो डोळ्यामुळे, मुर्तीच्या डोळयांमधलं वात्‍सल्‍य, प्रेम, सजीवता, उत्‍साह हे भाव मुर्तीला देवत्त्‍व तर प्रदान करतातचं सोबतच भक्‍ताला देवाशी लीन होण्यासाठी डोळेचं मदत करत असतात.

त्‍यामुळे मुर्तीकामात डोळयांना सर्वात जास्‍त महत्‍व आहे. मुर्ती किती जरी सुबक असली तरी पाणीदार डोळ्याविना मुर्तीला सजीवता येत नाही. त्‍यामुळे सजीव भासणारे डोळे साकारणे हे म्‍हणावं तितक सोपं काम नक्‍कीच नाही. अशाप्रकारे मुर्तीमध्ये महत्‍वाचे असणारे डोळे साकारणारे खास कारागीर असतात. जे फक्‍त डोळे आखणीचच काम करतात. 

मुर्ती शाळेमध्ये गणरायाच्या मुर्ती रंगवून पूर्ण तयार झाल्‍यावर शेवटी कोणते काम असेल, तर ते डोळ्यांची आखणी. मुर्तीकामात शेवटी डोळे रंगवले जातात. त्‍यात हातखंडा असणारे काही खास कलाकारचं डोळे रंगवण्याचे काम करतात. कारण डोळे रंगवताना जर चूक झाली, तर चुकीला माफी नाही या प्रमाणे सर्व मुर्तीवरचं त्‍याचा परिणाम होतो. त्‍यामुळे हे काम महत्‍वाचे आणि तितकेच जोखमीचे असते. म्‍हणुनच डोळे खास कारागिरांकडूनच आखले जातात. 

गणेश मुर्तींचे खास डोळे आखणारे कलाकार रोहीत वडणगेकर यांनी आपल्‍या डोळे आखण्याच्या कलेविषयी सांगताना म्‍हणाले की, डोळे रंगविणे हे काही लगेच जमणारे काम नाही. त्‍यासाठी स्‍वत:ला त्‍यामध्ये आवड तर हवीच शिवाय बघुन-बघुन सरावाने ही कला आत्‍मसात करावी लागते. यामध्ये चित्रशाळेत सुरूवातीला लहान मुर्तींना डोळे रंगवण्याचे काम दिले जाते. यानंतर सरावाने हे कसब आत्मसात झाल्‍यावर मग मोठ्‍या मुर्तींचे डोळे रंगवण्याचे काम दिले जाते. पण यामध्ये मनाची एकाग्रता, कलेची आवड, आणि नाविण्याची आवड असावी लागते. 

सध्या कोल्‍हापुरात गणेश मुर्तींच्या अनेक मोठ्‍या कार्यशाळा आहेत. या कार्यशाळेंमध्ये डोळे रेखाटणारे मात्र खास आणि ठराविकचं कलाकार आहेत. त्‍यामुळे अशा डोळे रंगविण्यात हातखंडा असणार्‍या कलाकारांना गणेशोत्‍सवात मोठी मागणी असते. 

 

सात रंगातुन साकार होतात सजीव डोळे

डोळे रंगविण्यासाठी सात रंगांचा वापर प्रामख्याने केला जातो. यात भुवयांसाठी चॉकलेटी किंवा काळा रंग डोळ्यांचा आतील भाग पांढरा रंग, बुभूळ रंगवण्यासाठी काळा, चॉकलेटी, निळा रंग, यासोबतच लाल,गुलाबी, आणि इतर रंगांचा शेडसाठी वापर केला जातो. 

एका मुर्तीचे डोळे ३० मिनटात 

कलाकाराला एक डोळा रंगवण्यासाठी साधारणत १२ ते १५ मिनिटे लागतात तर एका मुर्तीचे डोळे रंगवण्यासाठी ३० मिनिटे लागतात. 

डोळ्यांची अचूक निर्मिती

डोळे निर्मितीची प्रक्रीया पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे. कलाकार विविध रंगाचा वापर करून सफाईदारपणे ब्रशचा वापर करत मुर्तीवर इतक्‍या वेगाने डोळे साकारतो ते पाहणार्‍याच्या लक्षात ही येत नाही की, मुर्तीचे डोळे तयार झालेत. 

अशी ही कला सध्याच्या तरूणाईने आत्‍मसात केली, तर कलेतुन अर्थार्जनाचा एक डोळस मार्ग नक्‍कीच सापडू शकतो.