होमपेज › Kolhapur › ‘मुंबई पॅटर्न’ बाप्पांना पसंती

‘मुंबई पॅटर्न’ बाप्पांना पसंती

Published On: Jul 14 2018 12:21AM | Last Updated: Jul 13 2018 11:56PMकोल्हापूर : प्रिया सरीकर 

मागणी तसा पुरवठा...हे व्रत घेऊन काम करणार्‍या कोल्हापूरच्या मूर्तिकारांना मुंबईसह परराज्यांतून पसंती मिळत आहे. गेली दोन वर्षे मुंबईसाठी कोल्हापूरच्या घराघरांत शाडूचे 9 इंची उंचीचे लहानगे, पण सुबक बाप्पा साकारले जात आहेत. या मुंबई पॅटर्न गणेशमूर्तींना यावर्षी अधिक मागणी होऊ लागली आहे. आकाराने लहान पर्यावरणपूरक मुंबई पॅटर्न बाप्पांना कर्नाटक, गोवा व अन्य ठिकाणांहून मागणी होऊ लागल्याने कोल्हापूरच्या मूर्तिकारांचे काम वाढले आहे. 

परगावी शाडू मातीची मूर्ती पाठवताना विशेष काळजी घ्यावी लागत असल्याने ही जोखीम अनेकदा पत्करली जात नाही; पण प्रत्येक वर्षी मागणी होऊ लागल्याने गतवर्षीपासून अनेकांनी शाडूचे मूर्तिकाम सुरू केले आहे. मुंबईकरांसाठी बनवलेल्या विशेष बाप्पांना गोवा आणि कर्नाटकच्या व्यापार्‍यांकडूनही मागणी होऊ लागली आहे. सध्या मुंबईकरांसाठीचे बाप्पा रंगकामासाठी तयार आहेत. शाडू माती उपलब्ध झाल्यास गोवा आणि कर्नाटकसाठीही अशाच पॅटर्नच्या मूर्ती बनवून देण्याची तयारी कुंभार बांधवांनी दाखवली आहे. 

गतवर्षी कुंभार माल उत्पादक सोसायटीने शेणगाव, कोकण आणि मुंबईहून आणलेला 150 टन शाडू कोल्हापुरातील मूर्तिकारांना पुरवला होता. यंदा 210 टन शाडू उपलब्ध झाला आहे. परगावी जाणार्‍या मूर्ती वगळून कोल्हापुरात ज्या शाडूच्या मूर्ती वितरित होतात, त्या ठिकाणी शाडूच्या मूर्ती काहिलीत विसर्जन करून काहिलीत साठून राहणारा शाडू मूर्तिकारांना परत करावा, असे आवाहन कुंभार माल उत्पादक सोसायटीचे अध्यक्ष शांताराम माजगावकर यांनी केले आहे.