Mon, Mar 25, 2019 17:33होमपेज › Kolhapur › निधी करवीरचा, खर्च शिरोळला

निधी करवीरचा, खर्च शिरोळला

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 12:41AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीचा अभ्यास करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला. या सर्वेक्षणासाठी जिल्हा नियोजन मंडळाने नावीन्यपूर्ण योजनेतून 30 लाख रुपयांची तरतूद केली. हा पायलट प्रोजेक्ट करवीर तालुक्यात राबवण्याचा निर्णयही झाला. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवडही झाली. मात्र, खर्चाची माहिती विचारल्यानंतर करवीरऐवजी शिरोळ तालुक्यात हा निधी खर्च करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने दिल्याने प्रशासकीय यंत्रणा चकित झाली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन मंडळाला अंधारात ठेवून झालेल्या या कारभाराची चर्चा जिल्हा प्रशासनात सुरू आहे.

तंबाखूजन्य पदार्थांसह दूषित पाणी, रासायनिक खते, तणनाशकांचा वापर करून करण्यात आलेली भाजीपाला निर्मिती आदींचा कॅन्सरशी कशा संबंध आहे, हे शोधण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 2016-17 च्या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण योजनेतून या उपक्रमासाठी 30 लाख निधी देण्यास मंजुरी दिली. करवीर तालुक्याची निवडही याच बैठकीत करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळानेही या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली. करवीर तालुक्यातील सर्वेक्षण व त्यातून आलेली फलनिष्पत्ती पाहून सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, जिल्हा नियोजनकडून दिलेल्या कामाच्या निधीचा आढावा सुरू असताना आरोग्य विभागाने कॅन्सर सर्वेक्षणाचा निधी शिरोळ तालुक्यात खर्च करणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकार्‍यांची मान्यता न घेताच जिल्हा परिषदेने असा परस्पर निर्णय घेतल्याने अधिकारीही चकित झाले. नावीन्यपूर्ण योजनेसाठी ज्या घटकासाठी निधीची तरतूद केली आहे त्यावरच तो खर्च करणे कायदेशीरदृष्टीने बंधनकारक असताना शासन निर्णयाला बगल देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना वारंवार सूचना देऊनही हा प्रकार झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. हा निधी खर्च होण्यास काही महिने अवधी असताना आता तो कोणत्या तालुक्यात खर्च करायचा यावरूनच वाद निर्माण झाला आहे.