होमपेज › Kolhapur › गोव्यातील चार तरुणांचे अपहरण; पाचजणांना अटक

गोव्यातील चार तरुणांचे अपहरण; पाचजणांना अटक

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 12:59AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

गोव्यातील चार तरुणांच्या अपहरणप्रकरणी पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. 25 लाखांच्या खंडणीसाठी 10 डिसेंबरला चौघांचे अपहरण करण्यात आले होते. नेताजी संभाजी मोहिते (वय 23, रा. सेनापती कापशी, कागल) अवधूत संजय लुगडे (21, रा. अर्जुनवाडा, कागल), प्रवीण बाबासाहेब जाधव (28, रा. गुरुवार पेठ, निपाणी), मिलिंद सुरेश सोकासणे (वय 28, रा. महादेव गल्ली, निपाणी), आकाश संजय मोरे (वय 23, रा. आखोळ रोड, निपाणी) अशी अटक केलेल्यांची संशयितांची नावे आहेत. 

25 लाखांच्या खंडणीसाठी राहुल दिलीप धारगळकर (वय 21), ज्ञानेश्‍वर कोकाकर (21, दोघे रा. धुळेर- म्हापसा, गोवा), मनोज गावकर (20), सावळो गावकर (20, दोघे रा. मये, गोवा) या चौघांचे रविवार 10 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. 

गोव्याचे चारही तरुण शुक्रवार 8 डिसेंबरला शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून गोव्याकडे जाताना कागलमधून चौघांचे अपहरण करण्यात आले होते. तीन दिवस शोध घेऊनही अपहृत तरुण मिळत नसल्याने पालकांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस या अपहरणकर्त्यांच्या मागावर होते. मंगळवारी सायंकाळी संशयितांना ताब्यात घेतले.