Mon, Jun 24, 2019 16:52होमपेज › Kolhapur › कोल्हापूर फुटबॉलची शतकी परंपरा

कोल्हापूर फुटबॉलची शतकी परंपरा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा
सागर यादव , क्रीडा प्रतिनिधी


लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूंच्या राजाश्रयाने कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचा पाया मजबूत झाला. भावी पिढी निर्व्यसनी, सक्षम, आरोग्यदायी घडविण्यासाठी आणि प्राचीन कुस्तीच्या जतन-संवर्धनाच्या उद्देशाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात तालीम परंपरा सुरू केली. भावी पिढी निर्व्यसनी, सक्षम बनावी या उद्देशाने प्राचीन कुस्ती परंपरेचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने याला राजाश्रय दिला.

फुटबॉलची मुहूर्तेढ...

पहिल्या महायुद्धापूर्वी शेती व शैक्षणिक या विषयांची माहिती घेण्यासाठी लोकराजा राजर्षी शाहूंचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज व प्रिन्स शिवाजी महाराज इंग्लंडला गेले होते. तेथे त्यांनी फुटबॉल हाखेळ पाहिला आणि त्यांना तो आवडलाही. असा रांगडा खेळ आपल्या संस्थानातही खेळला जावा, या द‍ृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. इसवी सन 1914 च्या सुारास ते इंग्लंडहून अमेरिकामार्गे कोल्हापुरात आले. छत्रपती राजाराम महाराज राज्यकारभारात व्यस्त असल्याने प्रिन्स शिवाजी महाराजांनी जगप्रसिद्ध फुटबॉल खेळ कोल्हापुरात सुरू करण्याकरिता प्रयत्न चालविले. त्या काळात लेफ्टनंट नारायणसिंग हे फुटबॉल खेळत होते. त्यांच्याकडून माहिती घेऊन प्रिन्स शिवाजी महाराजांनी फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली (इसवी सन 1916-17). मात्र, प्रिन्स शिवाजी महाराजांचे इसवी सन 1918 मध्ये अपघाती निधन झाले. यामुळे छत्रपती राजाराम महाराजांनी फुटबॉल खेळ कोल्हापुरात रुजविण्याचे काम हाती घेतले. फुटबॉल खेळाची इत्यंभूत माहिती मिळवून त्यांनी कोल्हापुरात खर्‍या अर्थाने फुटबॉल खेळ रुजविला. अनेक संघ, खेळाडू घडविण्यासाठी स्वखर्चाने प्रयत्न केले. मैदान उपलब्धतेपासून ते खेळाडूंच्या आहारापर्यंतची व्यवस्था छत्रपती राजाराम महाराजांनी केली. फुटबॉल खेळाचे शास्त्रोक्‍त शिक्षण देण्यासाठी बाहेरून आणलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेणूक केली. यामुळे कोल्हापुरात अनेक संघ निर्माण झाले. ‘पॅलेस’टीम यापैकी एक टीम होय. भवानी देवी हे छत्रपतींचे कुलदैवत असल्याने पुढे या टीमचे नामकरण ‘जय भवानी’ असे करण्यात आले. अगदी आजही पॅलेसच्या कोणत्याही स्पोर्टस् टीमचे नाव ‘जय भवानी’ असेच असते. राजर्षी शाहूंचे नातू तत्कालीन देवास (मध्यप्रदेश) चे युवराज विक्रमसिंह पवार शिक्षणासाठी कोल्हापुरात आले होते. राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी फुटबॉल खेळाच्या आवडीतून डी. वाय.सी. तथा देवास युवराज क्लबची स्थापना केली. राजाराम कॉलेजची राजाराम कॉलेज इलेव्हन ही टीमही होती. अशा क्लबमध्ये फुटबॉलचे सामने आयोजित करणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भरघोस बक्षिसे देणे अशा स्वरूपाचे कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी केल्यामुळे कोल्हापुरात फुटबॉल खेळासाठी भक्‍कम पाया निर्माण झाला.

प्रतिकूल परिस्थतीतही विकास...

तरुण पिढी निर्व्यसनी सक्षम राहावी, या उद्देशाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात विविध खेळांना राजाश्रय दिला. त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या. पारंपरिक कुस्तीखेळा प्रमाणेच क्रिकेटसारख्या परदेशी खेळांनाही प्रोत्साहन दिले. त्यांचा हा वारसा चालविण्याचे कार्य त्यांच्या वंशजांनी केले. प्रिन्स शिवाजी, छत्रपती राजाराम महाराजांनी फुटबॉल हा रांगडा खेळ क्रीडानगरी कोल्हापुरात रुजविला. इतकेच नव्हे, तर त्याच्या विकासासाठीही प्रयत्न केले. अल्पावधीत फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढू लागली. पेठा-पेठांत असणार्‍या तालीम मंडळांतून फुटबॉलचे लोण पोहोचले. सर्वांनाच खेळण्यासाठी फुटबॉल उपलब्ध होत नसल्याने कागदाचा लगदा, रबराच्या गोळ्यापासून चेंडू करून तो लाथाडत फुटबॉल खेळला जायचा. मोकळ्या शेतवडीत, माळरानात फुटबॉलचा सराव चालायचा. पायात बुट व तत्सम गोष्टींचा मागमूसही नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही कोल्हापूरचा फुटबॉल वाढतच गेला.

जामदार व प्रॅक्टीस क्लब...

पहिल्या महायुद्धानंतर युद्धानंतर लष्करातून निवृत्त झालेल्या गणपतराव भोसले यांनी श्रीपतराव साळोखे ऊर्फ तात्या जामदार यांच्या साथीने कोल्हापुरात आल्यानंतर फुटबॉल संघ तयार केला. या संघाचा सराव पंचगंगा नदी काठी असणार्‍या शंकराचार्य मठ परिसरात होत होता. राजाराम हायस्कूलचे प्राचार्य मलकासिंग हेही त्यापैकीच एक. फुटबॉलसाठी काहीतरी करण्याच्या इच्छेुळेच त्यांनी इसवी सन 1922 च्या सुारास राजाराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा एक फुटबॉल संघ निर्माण केला. बाबालाल बागवान फुटबॉल स्पर्धेत हा संघ प्रॅक्टिस फुटबॉल क्लब या नावाने खेळविला. या संघापाठोपाठ कोल्हापुरात शिवाजी तरुण मंडळ, बालगोपाल, बाराईाम हे संघ निर्माण झाले.

छत्रपती शहाजी महाराजांचे योगदान...

छत्रपती राजाराम महाराजांनी रचलेल्या मजबूत पायावर विकासाचे कळस चढविण्याचे काम त्यांचे वंशज छत्रपती शहाजी महाराजांनी केले. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर देवासचे युवराज विक्रमसिंह पवार हे छत्रपती शहाजी या नावाने कोल्हापूर संस्थानचे महाराज बनले. छत्रपती राजाराम महाराजा यांच्यानंतर कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) ची धुरा छत्रपती शहाजी महाराज यांच्याकडे आली. 1947 ते 1983 अशी तब्बल 36 वर्षे म्हणजेच तीन तपे शहाजी महाराजांनी ‘केएसए’च्या पेट्रन इन चिफची जबाबदारी सांभाळली. केवळ नावापुरते पद न भुषविता फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, जिम्नॅस्टिक अशा खेळांच्या विकासासाठी प्रयत्न चालविले. विविध स्पर्धा आयोजनामुळे कोल्हापुरात खेळाडू व संघांची संख्या सातत्याने वाढत गेली. खेळाडूंना खेळण्यासाठी छत्रपती शाहू स्टेडियम, पोलो मैदान अशा मैदानांची निर्मितीही छत्रपती शहाजी महाराज यांच्या कारकीर्दीत झाली. बालगोपाल, बाराईाम, महाकाली, मेनन, केएमसी, माय सॉकर, सरदार तालीम, बागलचौकतरुण मंडळ, खासबाग तरुण मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, दिलबहार तालीम, पाटाकडील तालीम असे अनेक संघ कोल्हापूर शहरात तयार झाले. कोल्हापूर शहराबरोबरच गडहिंग्लज फुटबॉल संघ, दक्षिण सातारा पोलिस संघ (सांगली पोलिस), पोलंड संघ (गांधीनगर वळीवडे कॅम्प युद्ध कैदी), मिरज मेडिकल कॉलेज, आरवाडे बंधू इलेव्हन सांगली, गांधी चौक मिरज असे अनेक संघ निर्माण झाले.

नामवंत संघांची निर्मिती...

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन म्हणजेच ‘केएसए’च्या स्थापनेुळे कोल्हापूरच्या फुटबॉलला एक अधिष्ठान प्राप्त झाले. रांगड्या फुटबॉलची आवड आबालवृध्दांत प्रचंड प्रमाणात वाढल्याने खेळाडूंपाठोपाठ संघांची संख्याही वाढत गेली. यामुळे सहाजिकच फुटबॉलच्या स्पर्धाची संख्याही वाढू लागली. एकेकाळी कोल्हापूरकर छत्रपती, जतचे राजे, सांगलीकर पटवर्धन, अंकलीकर, कुरूंदवाडकर आदी संस्थानिकांच्यात रंगणारा फुटबॉल कोल्हापूरसह परिसरात गल्लीबोळात खेळला जाऊ लागला. जाम दार क्लब, प्रॅक्टिस क्लब पाठोपाठ शिवाजी तरुण मंडळ, बाराईाम बालगोपाल तालीम, दिलबहार तालीम, खासबाग तरुण मंडळ, बागल चौक फुटबॉल क्लब या तालीम-मंडळांच्या क्लबबरोबरच शालेय स्तरावरील सीटी क्लब, जॉली क्लब, इन्फन्ट्री क्लब, घोसरवाडकर क्लब,फर्नांडिस क्लब,न्यू हायस्कूल, मराठा बोर्डिंग, शिवाजी क्लब, बालवीर, लायन, टायगर, इगल आदी फुटबॉल संघ निर्माण झाले. शिवाजी तरुण मंडळ (1932), बालगोपाल तालीम (1946), दिलबहार तालीम मंडळ (1955) पाटाकडील तालीम मंडळ (1960), शाहूपुरी फुटबॉल संघ (1966), खंडोबा तालीम मंडळ (1991), संध्यामठ तरुण मंडळ (1990), गोल्डस्टार स्पोर्टस् असोसिएशन (1991), कै. अनिल मंडलिक स्पोर्टिंग (1994) या प्रमुख संघांपाठोपाठ महाकाली तालीम, उत्तरेश्‍वर तालीम मंडळ, जुना बुधवार पेठ तालीम, फुलेवाडी क्रीडा मंडळ, इथपासून ते आजच्या शिवनेरी व पॅट्रीएट स्पोर्टस्पर्यंत विविध संघ आणि त्यातून शेकडो फुटबॉलपटू कोल्हापुरात निर्माण झाले. छत्रपती शहाजी महाराजांच्यानंतर कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनची धुरा विद्यमान शाहू छत्रपती महाराज यांच्याकडे आली. त्यांनी भविष्यात फुटबॉल वाढवा आणि टिकावा, यासाठी विशेष प्रयत्न केले. ‘केएसए’ लिगसारख्या स्पर्धा सुरू करून कोल्हापुरातील संघांना आंतरराष्ट्रीय संघाच्या धर्तीवर क्रमवारी (रँकिंग) प्राप्त करून दिली. पूर्वी विस्कळीत असणार्‍या फुटबॉलला एकसंध करून सुसूत्रता आणण्याचे काम विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांनी केले. यामुळे कोल्हापुरात व्यावसायिक फुटबॉल संघही निर्माण झाले. यात एस.टी. महामंडळ फुटबॉल संघ (1966), कोल्हापूर महानगरपालिका संघ (1968), कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ (1965), मेनन अँड मेननचा संघ (1985) यांचा समावेश आहे.

स्पर्धांची परंपरा आणि विविधता...
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने सुरुवातीला दाभोळकर चषक (कनिष्ठ गट), केळवकर लिग (वरिष्ठ गट) या दोनच स्पर्धा व्हायच्या. यानंतर छत्रपती शहाजी महाराजांनी छत्रपती शाहू गोल्डकप स्पर्धेची सुरुवात केली. 1960 पासून दसरा चषक फुटबॉल स्पर्धेची सुरुवात झाली. अन्वर चषक, दामुअण्णा मालवणकर चषक स्पर्धाही होत होत्या. कालांतराने दाभोळकर व केळवकर लिगचे नामकरण केएसए ‘ए’ डिव्हिजन व केएसए ‘ब’ डिव्हिजन असे झाले. गेली अनेक वर्षे सातत्याने ही स्पर्धा अखंड सुरू आहे. आजच्या घडीला फुटबॉल क्लबची संख्या वाढल्याने अ, ब, क, ड, इ आणि ग्रामीण अशा विविध गटांत लिग स्पर्धा होते. या स्पर्धेतूनच फुटबॉल हंगाम ातील संघांचे रँकिंग ठरते.

वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा...

याशिवाय खेळाडूंना भरघोस आर्थिक पाठबळ देणार्‍या पुढारी पीएफपीएल, फुटबॉलला ग्लॅमर मिळवून देणारी महासंग्राम स्पर्धा, मुस्लिम बोर्डिंग चषक, पेठांत सलोखा राखणारी अस्मिता चषक, स्पर्धा आयोजनात सातत्य राखणारी, नेताजी तरुण मंडळाची नेताजी चषक स्पर्धा, शिस्तबद्ध 109 टी.ए. बटालियनची स्पर्धा, शालेय खेळाडूंसाठीचा कुफा चषक, ज्येष्ठ फुटबॉलपटूंसाठीची शिवाजी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या वेट्रन चषक फुटबॉल स्पर्धा, दिलबहार तालमीने 1985 साली सर्वप्रथम घेतलेली विद्युतझोतातील स्पर्धा, राजर्षी शाहू प्रतिष्ठान आयोजित राजर्षी शाहू चषक अशा वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धांनी कोल्हापूरची शतकी परंपरा परिपूर्ण बनली आहे.फस्ट लिगच्या ओएनजीसी या राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर भारत विरुद्ध हॉलंड या देशातील महिलांत मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामना कोल्हापूरकरांनी अनुभवला आहे.

विकासाचा महत्त्वाचा टप्पा...

छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापुरात रांगड्या फुटबॉलचा पाया मजबूत झाला. फुटबॉलबरोबरच इतर खेळांना पाठबळ मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराजांच्या कल्पनेतून 8 एप्रिल 1940 ला कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन म्हणजेच ‘केएसए’ची स्थापना करण्यात आली. संस्थेचे पेट्रन इन चिफ छत्रपती राजाराम महाराजांनी ‘केएस’च्या माध्यमातून फुटबॉल संघांचा समन्वय साधून त्यांच्या विकासासाठी पावले उचलली. 1940 पासून आजपर्यंत कोल्हापूरचा फुटबॉल ‘केएसए’च्या नेतृत्वाखाली विकसित होत आहे. किंबहूना ‘केएसए’ कोल्हापूरच्या फुटबॉलची शिखर संस्था म्हणून नावारूपाला आली आहे.
 

 

Tags : atalfootball2018, kolhapur football tradition, history of kolhapur football,kolhapur, kolhapur news


  •