होमपेज › Kolhapur › दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने जिंकली मने 

दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने जिंकली मने 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

करवीर नगरीच्या संस्थापिका रणरागिणी ताराराणी, कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी शाहू आणि कोल्हापुरात फुटबॉल परंपरेचा पाया रचणारे  छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यासह फुटबॉल खेळाची शतकी परंपरा आणि ‘केएसए’ च्या अमृत महोत्सवी वाटचालीची माहिती देणार्‍या विशेष कार्यक्रमाने देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या महिला फुटबॉलपटूंना ‘क्रीडानगरी’ कोल्हापूरची महती समजली. 

इंडियन वुमेन्स लीग 2017 फुटबॉल स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा रविवारी झाला. यानिमित्ताने आयोजित रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची  मने जिंकली. दरम्यान, रविवारी दिवसभरातील तीन सत्रांत हंस वुमेन फुटबॉल क्‍लब, क्रिपशा क्‍लब आणि ईस्टर्न युनियन क्‍लब यांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवून आघाडी  मिळविली. 

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन महापौर सौ. हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, केएसएचे चिफ पेट्रन शाहू महाराज, खा. संभाजीराजे, ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे,  सौ. संयोगीताराजे, ‘विफा’ च्या महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे, सौ. रूपाली नांगरे-पाटील, एआयएफएफच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सॅव्हिओ मडेरा, फिफा निरीक्षक अन्या (जर्मनी), एआयएफएफच्या स्काऊट शुक्‍ला दत्ता (कोलकोत्ता) व चित्रा गंगाधरण (बंगळूर), अर्जुन विजेत्या फुटबॉलपटू बेंम्बेमदेवी, इंडियन टीमच्या कर्णधार बालादेवी, सीईओ हेन्‍री मेनंजीस, संटर वाझ उपस्थित होते.

गीत, संगीत आणि नृत्यासह विविधतेचे दर्शन उद्घाटन सोहळ्यात गीत, संगीत आणि नृत्यासह विविधतेचे दर्शन झाले. सार्थक क्रिएशन, महालक्ष्मी प्रतिष्ठान व जिजाऊ ढोल ताशा पथक, शंभूराजे मर्दानी खेळ पथक, केएसएचे जिम्नॅस्टिक प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थी, छत्रपती शाहू विद्यालय, सौ. स. म. लोहिया हायस्कूल, उषाराजे गर्ल्स हायस्कूल, रोमँटिक डान्स ग्रुपच्या सुमारे 300 कलाकारांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.  

हंस वुमेन क्‍लबची साईवर मात
सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात दिल्लीच्या हंस वुमेन क्‍लबने साई वुमेन्स क्‍लबवर 4-0 अशी मात केली. हंस क्‍लबतर्फे  12 व्या आणि 14 व्या मिनिटाला भाग्यश्री दळवी हिने गोल नोंदवत संघाच्या आघाडीत भर घातली. मूळची कोल्हापूरची असणारी भाग्यश्री दिल्ली संघाकडून खेळते. तीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ किताबाने गौरविण्यात आले.    

क्रिपशाचा  विजय
क्रिपशा क्‍लबने पंजाबच्या युनायटेड वॉरिअर्स क्‍लबवर 5-01 असा एकतर्फी विजय मिळविला. चौथ्या मिनिटाला एलंगबाम बिंदयाराणी देवीने, 51 व्या मिनिटाला पेनल्टीवर लयटाँग बाम आशालता देवीने आणि 20 व्या,  33 व्या आणि 56 व्या मिनिटांना नॉगमायथेम रतनबालादेवीने तीन गोल्स नोंदवून संघाला 6-0 अशी भक्‍कम आघाडी मिळवून दिली.  ‘बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच’चा मान नॉगमायथेम रतनबालादेवी हिने पटकाविला.

ईस्टर्न स्पोर्टिंगची आगेकूच 

मुंबई रश फुटबॉल स्पोर्टस्ची अटीतटीची झुंज व्यर्थ ठरवत इस्टर्न स्पोर्टिंग युनियनने 2-0 अशा विजयासह आगेकूच केली. सामन्यात उत्कृष्ट खेळाबद्दल अ‍ॅरॉम परमेश्‍वरीदेवी हिला गौरविण्यात 
आले.   

आजचे सामने : 
जम्मू कश्मीर स्पोर्टस् कौन्सिल वि. सेतू फुटबॉल क्‍लब, दुपारी 12 वा. इंदिरा गांधी अ‍ॅकॅडमी वि. बरोडा फुटबॉल अ‍ॅकॅडमी, सायंकाळी 3.30 वा.