Tue, Jul 23, 2019 10:41होमपेज › Kolhapur › चित्रनगरीला व्यवस्थापकीय संचालकच नाही 

चित्रनगरीला व्यवस्थापकीय संचालकच नाही 

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 26 2018 11:05PMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

कोल्हापूरच्या चित्रनगरीवर शासन नियुक्त सदस्याची नेमणूक करण्यात आली. त्यांच्यामार्फत चित्रनगरीला निधी, चित्रीकरणासाठी बुकिंगचे नियोजन आदी बाबी केल्या जातात. पण, गेल्या चार महिन्यांपासून चित्रनगरीला व्यवस्थापकीय संचालकच मिळालेला नाही. संजय पाटील यांची चार महिन्यांपूर्वी जीएसटी विभागात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रनगरीवर सध्या तरी शासन नियुक्त कोणीच अधिकारी नसल्याने सुरू असलेल्या कामाचाही  बोजवारा उडाला आहे. 

 कोल्हापूरच्या चित्रनगरीची यापूर्वी एक संचालक मंडळ होते. दिवंगत अभिनेते राजशेखर, कृष्णराव सोळंकी यावर संचालक म्हणून काम करत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चित्रनगरीत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली होती.  तसेच मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे काम केले. पण, त्यावेळी चित्रनगरीच्या खुल्या माळरानावर कंपाऊंड नसल्याने ही झाडे तोडून नेण्यात आली. तर पाण्याची पाईपलाईनही चोरीला गेली. ना कोणी अधिकारी-कर्मचारी, ना कोणती सुरक्षा व्यवस्था, अशा स्थितीत पाटलाच्या वाड्यात कधीतरी शासकीय कर्मचारी येऊन बसायचे. फायलींवरची धूर झटकून पुन्हा चित्रनगरीला विसरून जायचे. यामुळे चित्रनगरीचा विकास खुंटला. 2005 पासून चित्रनगरीतील संचालक मंडळ बरखास्त करून व्यवस्थापकीय संचालकपद निर्माण केले. विलास पाटील वगळता संजय पाटील यांनीच व्यवस्थापकीय संचालक म्हणून सर्वाधिक काम केले आहे. 

त्यांच्या कार्यकाळात चित्रनगरीच्या विकासकामाला गती प्राप्त झाली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळांच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधून चित्रनगरीत आवश्यक असणारी लोकेशन, यासाठी शासन स्तरावरील विविध अधिकार्‍यांशी चर्चा करून निधी मंजूर करून आणणे. दर्जेदार काम झाले आहे की नाही याची खातरजमा संजय पाटील स्वत: करून घेत होते. मुंबईत असूनही दर आठ दिवसांनी ते कोल्हापुरात येऊन चित्रनगरीच्या कामाचा आढावा घेत होते. 13 कोटी रुपयांच्या निधीतून झालेल्या कामाचे बरेच श्रेय संजय पाटील यांनाच जाते. पहिल्या टप्प्यातील मिळालेल्या निधीतून चित्रनगरीची कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. अजूनही नवीन लोकेशनसाठी अंदाजे 30 कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे. पण, हा निधी आणण्यासाठी एका खमक्या अधिकार्‍याची गरज आहे.