Thu, May 28, 2020 23:25होमपेज › Kolhapur › चित्रनगरीचा विकास, स्टुडिओ अस्तित्वासाठी लढा 

चित्रनगरीचा विकास, स्टुडिओ अस्तित्वासाठी लढा 

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 12:23AM

बुकमार्क करा

कोल्हापूर :  सचिन टिपकुर्ले

 सरत्या वर्षात मराठी चित्रपट सृष्टीने बॉक्स ऑफिस हिट चित्रपट दिले नसले तरी वर्षभरात 120 चित्रपट प्रदर्शित झाले आहे. दशक्रिया, ती सध्या काय करते, निर्भया यासारख्या  चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दशक्रिया या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला. कोल्हापूरच्या चित्रनगरीचे काम अंतिम टप्यात असून जयप्रभा व शालिनी सिनेटोन स्टुडिओ जागेच्या अस्तित्वासाठी लढा चित्रपट महामंडळाच्या वतीने सुरूच आहे.

 गतवर्षी सैराट व नटसम्राट चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. सैराट चित्रपटाला तर तरुणाईने अक्षरश: डोक्यावर घेतले होते. चित्रपटाची कथा व गीते, कलाकारांचा अभिनय आणि सर्वात महत्त्वाचे संगीत या सर्वच पातळींवर चित्रपट हीट ठरला.  या चित्रपटाचे अन्य भाषेत रिमेक झाले. त्यामुळे 2017 सालात मराठी चित्रपटांमध्ये काय वेगळेपण असणार याकडे प्रेक्षकांची नजर होती. जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ती सध्या काय करते, चित्रपटाने युवा पिढीला काहीसे आकर्षित केले. सैराट फेम अक्षय ठोसरची भूमिका असणारा एफ यू (फ्रेंडशिप अनलिमिटेड) चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. कच्चा लिंबू, निर्भया, फास्टर फेने या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.  सरत्या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झालेला  दशक्रिया चित्रपट चर्चेत आला तो  राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या विरोधामुळे. चित्रपटामुळे विशिष्ट समाजाने आपल्या भावना दुखवल्याचा आरोप करून या चित्रपटावर बंदी आणली. पण शेवटी वाद निवळल्याने तो प्रदर्शित झाला. एकूणच मराठी चित्रपटांची निर्मिती शंभर  चित्रपटांच्या पुढे असली तरी बॉक्स ऑफिस हिट चित्रपटांचे प्रमाण कमीच होते.

 मराठी चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची बाब म्हणजे यावर्षी कोल्हापूरच्या चित्रनगरीचे काम पूर्णत्वाला लागले. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रनगरी सुरू व्हावी, यासाठी आंदोलन सुरू होते. राज्यातील युती सरकारने चित्रनगरीसाठी दिलेल्या निधीतून दोन टप्यांत चित्रनगरीचे स्वप्न साकारत आहे. जानेवारी महिन्यात चित्रनगरीत चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. 

 याशिवाय कोल्हापूरच्या चित्रपट इतिहासाचे साक्षीदार असणार्‍या जयप्रभा व शालिनी स्टुडिओ जागेच्या अस्तित्वासाठीचा लढा हा चर्चेचा विषय ठरला. जयप्रभा स्टुडिओची साडेतीन एकर जागा चित्रीकरणासाठी ठेवावी, अशी मागणी कलाप्रेमींकडून होत आहे. या जागेबाबत आता खासदार संभाजीराजे यांनी मध्यस्थी करून या ठिकाणी चित्रपटविषयक घडामोडींसाठी ही जागा उपलब्ध व्हावी, यासाठी  प्रयत्न करत आहेत.  तर शालिनी स्टुडिओचे 5 व 6 क्रमांकाचे भूखंड चित्रपटसाठी आरक्षित राहावेत, यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने लढा उभारला आहे.

महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर यासाठी मार्चे काढण्यात आले. शासनाने 2005 सालीच या जागेवर आरक्षण टाकले होते. महापालिकेने यासाठी पूरक असे आरक्षण टाकण्याचा ऑफिस प्रस्ताव महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवला पण तो नामंजूर करण्यात आला.  त्यामुळे महामंडळाने आंदोलनाचे हत्यार उपसले. याबाबत काय निर्णय होईल हा नंतरचा विषय आहे. पण कलाप्रेमींनी दोन्ही स्टुडिओंच्या जागेचे प्रश्‍न सुटत नाहीत तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे.