Wed, May 22, 2019 14:19होमपेज › Kolhapur › कोल्हापूरः अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त

कोल्हापूरः अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त

Published On: Feb 20 2018 8:55PM | Last Updated: Feb 20 2018 8:30PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शंभर, दोनशे, दोन हजार रुपयाच्या हुबेहुब बनावट नोटांची छपाई करून त्या भारतीय चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या आंतरराज्य रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने मंगळवारी छडा लावला. शिरोळ तालुक्यातील दोघांना जेरबंद करून 2 लाख 49 हजार 200 रुपयांच्या बनावट नोटांसह कलर प्रिंटर, बाँड पेपर्स अशी सामग्री हस्तगत करण्यात आली आहे. रॅकेटमध्ये कर्नाटकातील सराईत गुन्हेगार सक्रिय असल्याची माहितीही पुढे आली आहे.

विश्‍वास अण्णाप्पा कोळी (वय 27, रा. आलास), जमीर अब्दुलकादर पटेल (32, कनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. गांधीनगर (ता.करवीर) रेल्वेस्थानकावर संशयास्पद स्थितीत वावरणार्‍या दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत शंभर, दोनशे व दोन हजार रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटा आढळून आल्याचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.

चौकशीअंती विश्‍वास कोळी हा स्वत:च्या घरात कलर प्रिंटरवर नोटांची हुबेहुब छपाई करीत असे, तर जमीर पटेल हा कोल्हापूरसह बेळगाव, विजापूर जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी विशेषकरून बाजारपेठांसह धार्मिक स्थळे, बसस्थानक परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निष्पन्न झाले. एलसीबी पथकाने कोळी व पटेलच्या घरावर छापे टाकून दोन हजार रुपयाच्या 75, दोनशे रुपयाच्या 177, शंभर रुपयाच्या 638 अशा बनावट नोटा हस्तगत करून कलर प्रिंटर, बाँड पेपर्स असे साहित्य हस्तगत केले.

मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी संशयितांना पोलिस कोठडी दिली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या कारवाईत उपनिरीक्षक युवराज आठरे, राजेंद्र सानप, अमोल माळी, किरण गावडे, विजय कारंडे आदी सहभागी झाले होते.