होमपेज › Kolhapur › अतिक्रमण काढताना कर्मचारी-केबिनधारकांत हाणामारी

अतिक्रमण काढताना कर्मचारी-केबिनधारकांत हाणामारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शहरातील नवीन वाशी नाका परिसरातील महापालिकेच्या ओपन स्पेसमधील अतिक्रमण काढताना महापालिका कर्मचारी-केबिनधारकांत मंगळवारी दुपारी हाणामारी झाली. यात महापालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर जादा पोलिस बंदोबस्त मागवून हाणामारी करणार्‍या केबिनधारकांना ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिका कर्मचार्‍यांनी 
88 अतिक्रमणे उद्ध्वस्त केली. केबिन काढल्याने एका महिलेला चक्कर आली. दरम्यान, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी अधिकार्‍यांकडून घटनेची माहिती घेतली. 
महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्या वतीने सुरुवातीला राधानगरी रोडवरील संकल्प सिद्धी मंगल कार्यालय, साळोखेनगर रिंगरोड, साई मंदिर चौक या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये केबिन्स, शेडस् व हातगाड्यांचा समावेश होता. दुपारी 2 ते 6 या कालावधीत नवीन वाशी नाका ते साई मंदिर चौक या रस्त्यावरील सूर्यकांत मंगल कार्यालयलगतचे महापालिका ओपन स्पेसमधील अतिक्रमण करुन केलेली केबीन्स अशी एकूण 14 अतिक्रमणे काढण्यात आली. याठिकाणी केबीनधारक व महापालिका अधिकारी यांच्यामध्ये वादावादी झाली. केबीनधारकांनी अधिकार्यांना शिविगाळ करून एका कर्मचार्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर सुमारे सत्तरहून अधिक कर्मचारी एकत्र होऊन त्यांनी केबीनधारकांना मारहाण केली. केबीनधारकांनीही काठ्या हातात घेऊन कर्मचार्यांवर चाल केली. त्यामुळे धुमश्‍चक्री उडाली. जादा पोलीस बंदोबस्त मागवून विरोध करणार्‍या केबीनधारकांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. 

राधानगरी रोड व साळोंखेनगर रिंगरोडवरील होर्डिंग बोर्ड व बॅनर इत्यादी शहर विद्रुपीकरण करणारे 23 बोर्ड काढण्यात आले. अशा प्रकारे एकूण दिवसभरात 88 अतिक्रमणे काढणेत आली. उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस.के.माने, आर.के.जाधव, हर्षजीत घाटगे, अतिक्रमण प्रमुख पंडीत पोवार, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुनिल भाईक, सागर शिंदे, आर.एस.कांबळे, महानंदा सुर्यवंशी, सर्व्हेअर दत्तू पारधी, मुकादम व कर्मचारी यांनी केली. मोहिमेसाठी 70 कर्मचारी, 2 जेसीबी, 1 ट्रॅक्टर ट्रॉली, 3 डंपर, 1 बुम, 1 कटी वेलडिंग ट्रॉली अशी यंत्रणा कार्यरत होती. तसेच सदर कारवाई अग्निशम दल यंत्रणेखाली व जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे 4 पोलिस व मोबाईल व्हॅन यांचे सहाय्य घेण्यात आले.