Tue, Jun 25, 2019 21:43होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात राजकीय पक्षांना बंडाळीची लागण

जिल्ह्यात राजकीय पक्षांना बंडाळीची लागण

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 07 2018 10:59PMकोल्हापूर : रणधीर पाटील

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय नेत्यांच्या सुप्त इच्छा उफाळून येऊ लागल्या आहेत. पक्षांतर्गत हेवेदावे, वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील सर्वच पक्षांना बंडाळीचे ग्रहण लागले आहे. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेसमधील संघर्ष सर्वश्रुत आहेच; पण आता त्यात भर पडली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची. 

राष्ट्रवादीमध्ये खासदार विरुद्ध आमदार हा संघर्ष सुरू आहेच, आता त्यात माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या रूपाने मेहुणे-पाहुणेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजपमध्येही सुप्त संघर्ष आहे. मात्र, आतातरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पूर्ण कंट्रोल असल्याने उघड कोण बोलायचे धाडस करत नाही, एवढेच. 

राष्ट्रवादीत संशयकल्लोळ!
राष्ट्रवादीत आता उघड-उघड खासदार धनंजय महाडिक आणि आ. हसन मुश्रीफ यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. खा. महाडिक राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येऊनही भाजपशी असलेली सलगी वितुष्टाला कारणीभूत ठरली आहे. खा. महाडिक यांचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाशी पटत नसले, तरी त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चांगले राजकीय ट्यूनिंग जमवल्याचे सध्यातरी दिसते. 
खा. महाडिक व आ. हसन मुश्रीफ यांच्यात उघड टीकाटिपणी सुरू आहे. महाडिक आणि मुश्रीफ या दोघांनीही स्वतंत्रपणे आपापल्या पातळीवर लोकसभेची तयारी सुरू केली आहे. महाडिक यांनी मुश्रीफ यांचे विरोधक समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत कागलमध्ये एकत्रित कार्यक्रम घेतले. भेटीगाठी सुरू आहेत. या सर्व घडामोडी पाहता, महाडिक व मुश्रीफ हे  दोघे लोकसभेला एकत्र येतील याची शक्यता अत्यंत धुसर आहे.

 मेहुणे-पाहुणे समोरासमोर
गेली 25-30 वर्षे खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे माजी आमदार के.पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे मेहुणे-पाहुणे आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ए. वाय. पाटील यांनी आता राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी शड्डू ठोकला आहे. नेत्यांच्या या संघर्षात कार्यकर्त्यांचीही विभागणी झाली आहे. त्यामुळे लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत उभी फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

‘उत्तर’मध्ये भाजपसमोर प्रश्‍न!
‘कोल्हापूर उत्तर’मधून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याचे उत्तर अद्याप इच्छुकांसह कार्यकर्त्यांनाही मिळालेले नाही. सोशल मीडियावरून मात्र आतापासूनच इच्छुकांच्या समर्थकांकडून ‘अब की बार...’ म्हणून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे भाजपने आताच उमेदवारीचा ‘गुंता’ सोडविला नाही, तर ऐनवेळी उमेदवारीवरून ‘पेच’ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपकडून मागील विधानसभेला पराभूत झालेले महेश जाधव, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजप उमेदवारी कोणाला देणार? यावर ‘उत्तर’मधील भाजपची ‘वाट’चाल अवलंबून राहणार आहे.

‘स्वाभिमानी’ची तोफ भाजपच्या गडावर
एकेकाळी स्वाभिमानीची मुलूखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे राज्यमंत्री सदाभाऊ खोत आता भाजपचे शिलेदार झाले आहेत. त्यातूनच राज्यात ज्या ठिकाणी ‘स्वाभिमानी’चे अस्तित्व आहे, त्या ठिकाणी खोतांना विरोध होऊ लागला आहे. भाजपविरोधातील देशव्यापी आंदोलनातही खा. शेट्टी सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच खा. शेट्टींना त्यांच्या मतदारसंघात रोखण्यासाठी भाजपकडून खोतांना आर्थिक रसद पुरवली जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खा. शेट्टींविरोधात खोत भाजपच्या तिकिटावर लढत देऊ शकतात.