Sun, Aug 25, 2019 19:02होमपेज › Kolhapur › ‘कोजिमाशि’ सभेत गुरुजींचा राडा

‘कोजिमाशि’ सभेत गुरुजींचा राडा

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नोकर भरती, सभासदांचे असभ्य वक्तव्य या मुद्द्यांवरून एकमेकांना धक्काबुक्की करीत ‘गुरुजीं’नी प्रचंड गोंधळ घातला. प्रश्‍न विचारण्यासाठी माईकचा ताबा घेण्याच्या प्रकारावरून राडा केला. गोंधळ करणार्‍या सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या सभासदांना पोलिसांनी पांगविण्याचा प्रयत्न केला. तीन तासांहून अधिक तास चाललेल्या सभेत शिक्षकांनी दोन-तीनवेळा गदारोळ करीत सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण होते.

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेची 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा श्री शाहू सांस्कृतिक भवन येथे रविवारी झाली. प्रारंभी संस्थेचे सहकारतज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी शांततेचे आवाहन केले. सभासदांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिल्याशिवाय व्यासपीठ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. 

सभापती प्रा. हिंदुराव पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती देत, सभेला गालबोट लागेल असे वर्तन शिक्षक सभासदांनी करू नये, अशी हात जोडून विनंती केली.
विनाअनुदानित शिक्षकांकडून अभिनंदन ठराव संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी विनाअनुदानित शिक्षकांना सभासद केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडत अभिनंदनाचे पत्र दिले. सभापती पाटील यांनी उर्वरित 25 टक्के विनाअनुदानित शिक्षकांना दिवाळीपर्यंत सभासद करण्याचे आश्‍वासन दिले. सचिन पाटील यांनी कोणतीही ‘एनओसी’ न घेता कर्ज द्यावे, अशी वेगळी मागणी केली. त्यावर सभापतींनी या विषयाचा कायदेशीर चौकटीतून याचा विचार करू, असे सांगितले. आर. डी. मोरे यांनी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात संस्थेचा देशात नावलौकिक होईल, अशी सभासदांना भेट देण्याची मागणी केली.

नोकरभरतीवरून विरोधक आक्रमक; गोंधळ

विनोद उत्तेकर यांनी, संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असताना नोकरभरतीची गरज आहे का, असा सवाल उपस्थित केला. नोकरभरतीचा न्यायालयात अंतिम निकाल प्रलंबित असताना हा खर्च सभासदांच्या माथी मारला आहे. कर्मचारी भरती स्थगितीचा ठराव करावा, अशी मागणी केली. यावेळी सभासदांनी ‘नामंजूर, नामंजूर’च्या घोषणा देत गोंधळास सुरुवात केली.

दादासाहेब लाड यांनी हस्तक्षेप करीत, 1997 नंतर यावर्षी आवश्यकतेनुसार शिपाई व लिपिक 23 कर्मचार्‍यांची भरती केल्याचे सांगितले. त्यावेळी विरोधकांनी व्यासपीठाजवळ येत जास्तच गोंधळ सुरू केला. गोंधळ सुरू असताना सभापती प्रा. पाटील यांनी, सभा उधळू नका, नोकरभरती प्रश्‍नाला उत्तरे देतो, असे सांगत शांततेचे आवाहन केले. कर्मचारी भरती केल्यानंतर 180 दिवसांनंतर त्यांना नियमित केल्याचे सभापतींनी सभागृहास सांगितले. तरीही सभासदांनी गोंधळ घालत माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सभासदांना शांत करीत जागेवर बसविले.

असभ्य वक्तव्यावरून लोटके यांना धक्काबुक्की

इचलकरंजीच्या संजय लोटके यांनी, कांडगाव हायस्कूलमधील शिपाई संजय दाभाडे यांना सभेच्या एक तास अगोदर हृदयविकाराचा झटका आला. त्यास तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे काम केले आहे. त्यांनी हे सत्कर्म व्यासपीठावरून सांगणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले. यावेळी काही सभासदांनी व्यासपीठावर येत लोटके यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. लोटके यांनी सभासदांची माफी मागावी, अशी मागणी सभापती व सभासदांनी लावून धरली. यावेळी सभागृहात अर्धा तास प्रचंड गोंधळ सुरू होता. बंदोबस्तास असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांनी हस्तक्षेप करीत सभासदांना पुन्हा शांत केले. लोटके यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वातावरण शांत झाले.

जे. बी. जाधव यांनी, सभासद करताना संचालकांच्या सहमतीची काय गरज आहे, असा सवाल केला. रंगराव तोरस्कर यांनी, कार्यालयीन कामकाजाची वेळ एक ते सात करावी, अशी मागणी केली. आनंदराव इंगवले यांनी, कोअर बँकिंग व शुद्ध पाण्याचा मुद्दा मांडला. प्रा. सयाजीराव देसाई यांनी, दादासाहेब लाड यांच्याविषयी मांडलेल्या मतावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. संजय पाटील यांनी कर्जमुक्ती योजना व बिनव्याजी पैसे परत देणे, शेअर्स मर्यादा या मागणीचा ठराव मांडला.

सभासदांची दिशाभूल; विरोधकांची पत्रकबाजी

‘कोजिमाशि’च्या सभेत नियम धाब्यावर बसवून सत्ताधार्‍यांनी सभासदांची दिशाभूल केल्याचा आरोप विरोधकांनी पत्रकातून केला आहे. राधानगरी शाखा सुरू करण्याबाबत सभा संपेपर्यंत निर्णय झाला नाही. शेअर्स मर्यादा वाढविण्याची सभासदांची अपेक्षा फोल ठरली. बिनव्याजी कर्जमुक्ती निधी परत देण्याच्या पोटनियमात खुलासा करताना चुकीची माहिती दिली गेली. काही सभासदांच्या कर्जावर जास्त व्याज आकारणी करून हप्ता वसूल केला. अशा सभासदांना न्याय द्यावा, अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे.