Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Kolhapur › यवलूज-पोर्ले बंधार्‍याची गळती शेतकर्‍यांच्या मुळावर 

यवलूज-पोर्ले बंधार्‍याची गळती शेतकर्‍यांच्या मुळावर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पोर्ले तर्फ ठाणे : वार्ताहर

कासारी नदीवरील यवलूज-पोर्लेदरम्यान असणार्‍या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यातून होत असणारी पाणी गळती शेतकर्‍यांच्या मुळावरच उठली आहे. पाणी साठून राहत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षच आहे पण पाणीपट्टी वसुलीसाठी तगादा लावून शेतकर्‍याला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे.

यवलूज-पोर्ल बंधार्‍याला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे गेळवडे लघुप्रकल्पातून वारंवार पाणी सोडले जाते. तसेच राजाराम व शिंगणापूर बंधार्‍यातून पाणी आडवून बॅक वॉटर सोडले जाते पण यवलूज पोर्ले बंधारा खीळखिळा झाला आहे. याची तात्पुरती दुरुस्ती केली जाते. या बंधार्‍याच्या मोठ्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. तर दुरुस्ती कशी करायची एवढे सांगून पाटबंधारे विभागाकडे दुर्लक्ष करीत आहे.

काही वर्षांपूर्वी हेच धरण सहकारी धरण सोसायटीकडे सहकार तत्त्वावर चालवले होते. त्याकाळी लाकडी बरगे टाकून मातीने भरून पाणी अगदी व्यवस्थित साठवणूक होत होती. पण अलिकडच्या काळात हे धरण पाटबंधारे विभागाकडे वर्ग झाले तेव्हापासून या बंधार्‍याच्या पाणी साठवणुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

बंधार्‍यावर अवलंबून असणार्‍या पश्‍चिमेकडील चौदा गावांचा शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. मार्च महिन्यात दोनदा गेळवडे प्रकल्पातून दोनवेळा बॅक वॉटर असे एक महिन्यात चार वेळा पाणी सोडले होते. आठ दिवस पाण्याने नदी भरून वाहायची पण पाणी सोडणे बंद झाले की, नदी दोन दिवसात कोरडी पडते याचे कारण यवलूज-पोर्ले बंधार्‍याला लागलेली मोठी गळती व या गळतीकडे पाटबंधारे विभागाचे असणारे दुर्लक्ष, यावर ठोस उपाययोजना करून बंधार्‍याची दुरुस्ती करावी व गळती थांबवावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

31 मार्चला वसुलीसाठी तुम्ही तगादा लावला, पाणीपट्टी भरा नाहीतर जप्ती केली जाईल, पाणी उपसा बंद केला जाईल. असे जाहीर करणार्‍या पाटबंधारे विभागाने पहिले धरण दुुरुस्त करा, पाणी गळती थांबवा, मगच वसुली करा; असा उलटा प्रश्‍न शेतकरी करीत आहे. एकंदरीत बंधार्‍याची दुरुस्ती करून पाणी साठवणूक केली तरच शेतकरी जगणार आहे. नाहीतर येणारे दोन-तीन महिने पाण्यासाठी महाकठीण असणार आहेत. तेव्हा यवलूज-पोर्ले बंधार्‍याची दुरुस्ती करून गळती थांबवा नाहीतर यासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल अशी चर्चा सर्वत्र होत आहे.


  •