Fri, Apr 26, 2019 18:09होमपेज › Kolhapur › अडीच लाखांची लाच घेताना तहसीलदार अटकेत

कागल तहसीलदार घाडगे, दोन तलाठी लाचप्रकरणी जाळ्यात

Published On: May 17 2018 8:15PM | Last Updated: May 17 2018 8:50PMकागल : प्रतिनिधी

कागल तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे, सुळकूड तलाठी श्रीमती शमशाद दस्तगीर मुल्ला, एकोंडी तलाठी मनोज अण्णासो भोजे यांना गुरुवारी 2 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी तहसीलदार कार्यालयातच रंगेहाथ पकडले. एक तहसीलदार आणि दोन तलाठी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील संजय धोंडिराम जगताप यांच्या वडिलांनी सुळकूड येथील जमीन गट क्रमांक 443 मधील 76 आर जमीन ही सन 2012 साली खरेदी केली आहे. जमिनीचे सातबारा पत्रकी नाव नोंद होण्यासाठी सुळकूड तलाठी शमशाद मुल्ला हिच्याकडे अर्ज दिला होता. अर्जदार जगताप यांनी तलाठी मुल्ला हिची व तहसीलदार घाडगे यांची वेळोवेळी भेट घेतली होती. शमशाद मुल्ला हिने जगताप यांच्याकडे सातबारा पत्रकी नाव  नोंदविण्याकरिता स्वतःसाठी एक लाख रुपयांची मागणी केली.

मी तहसीलदार किशोर घाडगे यांची भेट घेतली असून, त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांची आता बदली होणार आहे, ते तुमचे काम करून देण्यास तयार आहेत, त्यासाठी त्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली आहे. तहसीलदारांना दोन लाख रुपये व स्वत:साठी एक लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपये द्यावेत, असे मुल्ला हिने जगताप यांना सांगितले. जगताप यांना मुल्ला हिने त्यांच्या राहत्या घरी कसबा सांगाव येथे 16 मे रोजी भेट घेण्यासाठी बोलावले. त्यानंतर अर्जदार जगताप यांनी अँटीकरप्शन ब्युरो कोल्हापूर यांच्याकडे 15 मे रोजी तक्रार दाखल केली.

16 मे रोजी तलाठी शमशाद मुल्ला हिच्या राहत्या घरी कसबा सांगाव येथे तक्रारदार जगताप यांनी समक्ष भेट घेऊन लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली. मुल्ला हिने त्यावेळी स्वत:साठी एक लाख रुपये व तहसीलदारांसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. तसेच स्वत:साठी मागणी करण्यात आलेल्या रकमेपैकी आता 50 हजार रुपये व नंतर 50 हजार रुपये द्या, असे सांगून ती रक्कम 17 मे रोजी तहसीलदार कार्यालय येथे घेऊन येण्यास सांगितले. तसेच तहसील कार्यालय येथे तहसीलदार किशोर घाडगे यांची समक्ष भेट घालून देत असल्याचे सांगितले; असे जगताप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

गुरुवारी 17 मे रोजी तहसील  कार्यालय येथे तलाठी शमशाद मुल्ला व तहसीलदार किशोर घाडगे यांच्या विरोधात सापळा रचण्यात आला. तहसीलदार किशोर घाडगे यांनी तलाठी मुल्ला हिला पैसे स्वीकारण्यास दुजोरा दिल्यावरून तलाठी शमशाद मुल्ला हिच्या सांगण्यावरून तलाठी मनोज भोजे याने तक्रारदार जगताप यांच्याकडून तहसीलदार किशोर घाडगे यांच्याकरिता दोन लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर तक्रारदार जगताप यांनी तहसीलदार घाडगे यांची भेट घेऊन रकमेबाबत खात्री केली.

पाठलाग करून भोजेला पकडले

तलाठी शमशाद मुल्ला यांनी तहसीलदार कार्यालयातील तळमजल्यावर असलेल्या कँटीनमध्ये तक्रारदार जगताप यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी करून, ती रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारून सोबत असलेले तलाठी मनोज भोजे यांच्याकडे दिली. त्यावेळी जगताप यांनी केलेल्या इशार्‍यामुळे दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी तलाठी शमशाद मुल्ला हिला ताब्यात घेतले. तलाठी मनोज भोजे सावध होऊन घटनास्थळावरून पळून जाऊ लागला. त्यावेळी अधिकार्‍यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.

त्यानंतर मनोज भोजे याच्याकडून एकूण 2 लाख 50 हजार रुपयांची लाच जप्त करण्यात आली. तलाठी मुल्ला, भोजे व तहसीलदार किशोर घाडगे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांविरोधात कागल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अँटीकरप्शन ब्युरो पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार गायकवाड, कोल्हापूर अँटीकरप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक गिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक मारुती पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस नाईक आबासो गुंडणके व संदीप पावलेकर, हे. कॉ. रुपेश माने, छाया पाटोळे व चालक विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.