Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील डॉक्टरांचा एनएमसी विधेयकाला विरोध

जिल्ह्यातील डॉक्टरांचा एनएमसी विधेयकाला विरोध

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 03 2018 12:10AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

नॅशनल मेडिकल कौन्सिल (एनएमसी) नावाचे विधेयक कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या विधेयकाला विरोध म्हणून आयएमएच्या कृती समितीने मंगळवारी देशभरात काळा दिवस पाळला. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून या विधेयकाचा निषेध नोंदविला. जिल्ह्यातील 3,000 डॉक्टर यामध्ये सहभागी झाल्याचे असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. 

मंगळवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत वैद्यकीय सेवा काही रुग्णालयांत बंद ठेवली, तर काही ठिकाणी वैद्यकीय सेवा सुरू होती; पण डॉक्टरांनी काळ्या फिती लावून विधेयकाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. देशभरातील 4 लाख डॉक्टरांनी या संपात भाग घेतला आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर यामध्ये सहभागी झाले होते. वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रलंबित प्रश्‍नांची सोडवून करण्याऐवजी विधेयक मंजूर करण्याचा घाट सरकारचा आहे. राज्यातील प्रतिनिधींशी चर्चा न करताच या बिलाचा मसुदा बनविला आहे. विधेयक मान्य झाल्यास वैद्यकीय शिक्षणातील भ्रष्टाचारात वाढ होईल, असे काही तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे, सचिव डॉ. संदीप साळोखे, डॉ. अशोक जाधव, डॉ. अजित लोकरे, डॉ. शीतल देसाई आदींनी पुढाकार घेतला.