Sun, Jun 16, 2019 12:54
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › जिल्हाध्यक्ष पदावरून काँगे्रसमध्ये संघर्ष अटळ

जिल्हाध्यक्ष पदावरून काँगे्रसमध्ये संघर्ष अटळ

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 03 2018 12:55AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

जिल्हाध्यक्षपदावरून काँगे्रसमध्ये संघर्षाची चिन्हे आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे एकेकाळी समर्थन करणारे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्यासह आ. सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आवाडे यांच्या नियुक्‍तीची मागणी केल्याने पक्षांतर्गत राजकारणात पी.एन. एकाकी पडण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थापनेनंतर सलग 19 वर्षे जिल्हाध्यक्षपदी राहण्याचा मान पी.एन. यांनी मिळवला. या काळात त्यांच्यासह पक्षाने अनेक चढ-उतार बघितले. दोन निवडणुकांतील पराभव, जिल्हा परिषदेत मुलाला अध्यक्षपदाने ऐनवेळी दिलेली हुलकावणी, जवळच्या लोकांनी केलेला दगाफटका अशा परिस्थितीतही काँगे्रस एके काँगे्रस हाच मंत्र पी.एन. यांनी जपला. पक्षाच्या नियमानुसार दहा वर्षांनंतर अध्यक्ष बदलले जातात, त्यानुसार 2012 साली अध्यक्षपदाची निवडणूक लागली. त्यात पी.एन. यांनी या पदासाठी आपला म्हणून माजी आमदार संजय घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरोधात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी अर्ज भरला. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे घाटगे विजयी झाले; पण त्यानंतर झालेल्या हाणामारीमुळे ही निवडणूक गाजली. पक्ष पातळीवर याची गंभीर दखल घेऊन या निवडीला स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून पी.एन. हेच या पदावर कार्यरत आहेत. 

केंद्र व राज्य सरकारविरोधात काँगे्रसने सुरू केलेल्या राज्य पातळीवरील जनसंघर्ष यात्रेची सुरुवात कोल्हापुरातून झाली. या जनसंघर्ष यात्रेत पी. एन. पाटील यांची अनुपस्थिती होती. या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे ती काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष बदलाची. पी.एन. यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्यासह सतेज पाटील यांनी आवाडे यांना जिल्हाध्यक्ष करावे, असे पत्रच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिले आहे. 

राज्याच्या राजकारणात कै. विलासराव देशमुख हे पी.एन. यांचे गॉडफादर होते. सद्यस्थितीत त्यांची जबाबदारी घेणारा नेता राज्यात नाही. पी.एन. यांची पक्षनिष्ठा वादातीत असली, तरी राज्य व देश पातळीवरील पक्षाच्या नेत्यांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. काँगे्रसच्या संस्कृतीतील हायकमांड व त्यांच्या भोवतीची लॉबी सांभाळणे गरजेचे असते, ते त्यांच्याकडून झाले नाही. त्यामुळेच ते आज पक्षात एकाकी पडले आहेत. 

दुसरीकडे, त्यांच्यानंतर येऊन आ. सतेज पाटील यांनी कै. विलासराव देशमुख यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सांभाळून घेत राजकारण केले. दिल्लीची लॉबीही ते यशस्वीपणे सांभाळू शकले, त्यामुळेच आज पी.एन. यांच्यावर कुरघोडी करण्यात त्यांना यश आले. आवाडे यांचे राष्ट्रीय पातळीवर नेत्यांशी पूर्वीपासूनच संबंध आहेत. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी मल्‍लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीनंतर आवाडे यांची राष्ट्रीय पातळीवरील ताकदही वाढली. आवाडे-सतेज यांनी  लवचीकपणा दाखवला, त्यामुळे अध्यक्षपदाच्या चर्चेत आवाडे आघाडीवर असल्याचे चित्र आहे.