Mon, Jul 15, 2019 23:57होमपेज › Kolhapur › चंदनशिवेसह तिघांच्या जामीन रद्दसाठी प्रस्ताव

चंदनशिवेसह तिघांच्या जामीन रद्दसाठी प्रस्ताव

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 1:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वारणानगर चोरीतील संशयित व सांगलीतील निलंबित पोलिस अधिकारी सूरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, मैनुद्दीन मुल्ला याचा मंजूर जामीन रद्द करण्यासाठी ‘सीआयडी’ने विधी व न्यायविभागाकडे शुक्रवारी प्रस्ताव दाखल केला. प्रस्तावावर निर्णय झाल्यास तातडीने हायकोर्टात अपिल दाखल होईल, असे सांगण्यात आले.

वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील फ्लॅटमधील 9 कोटी 18 लाखांच्या चोरीप्रकरणी सांगली पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निलंबित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक निरीक्षक चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळेसह 9 संशयितावर गतवर्षी गुन्हा दाखल झाला आहे.

कुरळपकर वगळता सर्व संशयितांना ‘सीआयडी’ने यापूर्वीच अटक केली आहे. त्यापैकी चंदनशिवे, शंकर पाटील, मैनुद्दिन मुल्लाला जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच सशर्त जामीन मंजूर केला आहे. ‘सीआयडी’चे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी गेल्या आठवड्यात अधिकार्‍यांची बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला.

हायकोर्टात तत्काळ अपिल दाखल होणार 
तीनही संशयितांचा जामीन रद्द करण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. असे ‘सीआयडी’चे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी सांगितले. प्रस्तावाला मंजुरी मिळताच तातडीने हायकोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मालमत्तेचा ‘महसूल’कडून लेखाजोखा मागविला
फरारी संशयित कुरळपकरचा महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यांत शोध घेतला. पण, त्याचा सुगावा लागला नाही. कुरळपकरच्या स्थावर मालमत्तेची महसूल खात्याकडून माहिती मागविण्यात आली आहे. त्यावर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयासह वरिष्ठाकडून अद्याप आदेश नाहीत
वारणानगर शिक्षण संस्थेचे सचिव जी. डी.पाटील व बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांच्या चौकशीसाठी जनसुराज्य पार्टीचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी केलेल्या मागणीबाबत डॉ. बारी म्हणाले की,  संबंधित गुन्ह्याचा तपास कोडोली पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे पाटील, सरनोबत यांच्या चौकशीबाबत न्यायालय अथवा वरिष्ठाधिकार्‍यांकडून अद्याप आदेश नाहीत, असेही ते म्हणाले.

 साक्षीदारावर दबावतंत्र शक्य
संशयित चंदनशिवेसह तिघांना जामीन झाल्याने त्याच्याकडून भविष्यात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होईल,शिवाय साक्षीदारावरही दबावतंत्राचा अवलंब होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. मंजूर जामीन रद्द करण्यासाठी तातडीने हायकोर्टात अपिल करण्यासाठी त्यांनी तपासाधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या.