होमपेज › Kolhapur › जयसिंगपूर जैन मंदिर : चोरीचा पुजारीच सूत्रधार

जयसिंगपूर जैन मंदिर : चोरीचा पुजारीच सूत्रधार

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 1:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

 जयसिंगपूर येथील जैन श्‍वेतांबर मंदिरात महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने शुक्रवारी छडा लावला. राजस्थानमधील दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, दागिने असा 12 लाख 43 हजार रुपये  किंमतीचा ऐवज जप्त केला. मंदिरातील सहायक पुजार्‍यानेच राजस्थान येथील कुख्यात टोळीला हाताशी धरून चोरीचा कट रचल्याचे उघड  झाले आहे. पसार चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत.

शंकर उर्फ सिकाराम भारमाजी गरासिया (वय 26), धन्नाराम दौलाराम गरासिया (19, पाट्रीयाकी ढाणी, शिंगटाभाटा, ता. बाली, जि. पाली, राजस्थान) अशी चोरट्यांची नावे आहेत. आणखी चौघेजण पसार झाले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेशसह गुजरातेत संशयितांविरुद्ध दरोडा, लुटमार, चोरीसह गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

कुख्यात लुटारू टोळीतील फरारी साथीदार हाताला लागल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह अन्य राज्यातील गंभीर गुन्हे उघडकीला येण्याची शक्यताही मोहिते यांनी व्यक्त केली. जैन श्‍वेतांबर मंदिरात काम करणार्‍या शंकर उर्फ सिकाराम यानेच सराईत टोळीला हाताशी धरून मंदिरात चोरी केल्याचे उघड झाले आहे.
चोरट्याकडून साडेचार लाखांची रोकड, 4 लाख 86 हजार रुपये किमतीचे 18 तोळ्यांचे सोन्याचे तीन हार, 3 लाख 10 हजार रुपये किमतीचा चांदीचा पाट जप्त केला आहे. अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, जयसिगंपूरचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, ‘एलसीबी’चे  निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने ही कामगिरी बजाविल्याचे मोहिते यांनी सांगितले.

जयसिंगपूर येथील स्टेशन रोडवरील तिसर्‍या गल्लीच्या कोपर्‍यावर दि. 13 मार्च रोजी मध्यरात्रीला जैन श्‍वेतांबर मंदिर आवारातील कार्यालय फोडून कपाटातील रोकड, दागिन्यासह 15 लाखांचा ऐवज लंपास केला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, अधीक्षक मोहिते यांनी घटनेची गंभीर दखल घेत चोरट्यांचा छडा लावण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या.

उपअधीक्षक पिंगळे, दिनकर मोहिते यांनी पाठपुरावा करून चोरट्यांचा माग काढला. मंदिरातील कामगार शंकर उर्फ सिकारामने व्यवस्थापन समितीकडे जादा पगाराची मागणी केली होती. त्यास    नकार दिल्याने तो डूख धरून होता. होळीच्या सणानिमित्त शंकर उर्फ सिकाराम 27 फेब्रुवारीला राजस्थानला गेला. बाली जिल्ह्यातील सराईत टोळीशी संगनमत करून त्याने जैन श्‍वेतांबर मंदिरातील चोरीचा कट रचला. शंकरसह सहा संशयित दि.12 मार्चला ट्रॅव्हल्सने राजस्थानातून जयसिंगपुरात आले. सायंकाळी शंकरने मंदिराची रेकी करून चोरट्यांना मंदिरातील अंतर्गंत रचनेची माहिती दिली. मध्यरात्री दीडला मंदिराचे कार्यालय फोडून सुमारे 15 लाखाचा किंमती ऐवज लुटला.

राजस्थान पोलिसांच्या मदतीने चोरट्यांच्या घरावर छापा
राजस्थानातील सुमेरपूरचे पोलिस उपअधीक्षक अमरसिंग चंपावत, निरीक्षक दाउदखान यांच्या मदतीने सहायक निरीक्षक युवराज आठरे व त्यांच्या पथकाने गुरूवारी रात्री उशिरा संशयितांच्या घरावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. चोरीतील सुमारे साडेबारा लाख रूपये किंमतीचा ऐवजही पथकाने जप्त केला आहे. कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सहायक निरीक्षक दत्तात्रय कदम, राजेंद्र सानप, सुजय दावणे, श्रीकांत पाटील, संदीप कुंभार, जितेंद्र भोसले, विजय कारंडे, वैशाली पाटील आदींनी प्रयत्न केल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

Tags : kolhapur, district, Jaysingpur, Jain Temple,